दोन भागात विभागली जातेय भारताची भूमी, कधीही होऊ शकतो विध्वंसक भूकंप, चिंताजनक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:34 IST2025-04-13T15:23:22+5:302025-04-13T15:34:00+5:30
Earthquake In India: अमेरिकन जियोफिजिकल यूनियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अध्ययनानुसार भारताची प्लेट ही २ भागात विभाजित होत आहे, तसेच त्यामुळे येथील संपूर्ण भूगोलच बदलून जाण्याची आणि त्याला नावा आकार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताची भूमी दोन भागात विभागली जात असून, त्यामुळे इथे कधीही विध्वंसक भूकंप होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकन जियोफिजिकल यूनियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अध्ययनानुसार भारताची प्लेट ही २ भागात विभाजित होत आहे, तसेच त्यामुळे येथील संपूर्ण भूगोलच बदलून जाण्याची आणि त्याला नावा आकार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या अध्ययनानुसार सुमारे ६० दशलक्ष वर्षांपासून भारताची प्लेट ही यूरेशियन प्लेटवर आदळत आहे. ही भारतीय प्लेट डिलेमिनेशनच्या नव्या प्रक्रियेमधून जात आहे. या प्रक्रियेत भारतीय प्लेटचा घनत्व असलेला भाग हा पृथ्वीच्या गाभ्यामध्ये सामावत आहे. त्यामुळे प्लेटच्या आतमध्ये तडा जात आहे.
डिलेमिनेशनची ही प्रक्रिया प्लेटच्या स्थैर्याला प्रभावित करत आहे. त्यामुळे या परिसरात भूकंपाचा धोका वाढला आहे. यट्रेक्ट युनिव्हर्सिटीचे जियॉलॉजिस्ट डोवे हिंसबर्गेन यांनी दिलेल्या माहितीनुसार टेक्टॉनिक शिफ्टला आतमधून क्रियान्वित करणाऱ्या क्रिया वेगाने बदलत आहेत. तसेच त्या समजून घेणं खूप कठीण आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापिठाचे जियोफिजिस्ट सायमन क्लेम्परर यांनी सांगितले की, हिमालयाच्या उच्च कंप्रेशन असलेल्या भागात टेक्टॉनिक प्लेट्समध्ये अनेकदा तडे गेलेले दिसतात. या तड्यांमुळे पृथ्वीच्या पृष्टभागावर तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे भूकंपाचा धोका वाढतो.
डिलेमिनेशनची प्रक्रिया या परिसरात तणाव खूप वाढवू शकते. त्यामुळे वारंवार भूकंपाचे तीव्र धक्के जाणवतात. तज्ज्ञांच्या मते ही प्रक्रिया तिबेटच्या पठारावर तडे निर्माण करू शकते.
तज्ज्ञांच्या मते प्लेटच्या दोन भागात विभाजित होण्याच्या या प्रक्रियेचे हे प्राथमिक संकेत आहेत. त्यावर आणखी संशोधन होण्याची आवश्यकता भासणार आहे. या प्रक्रियेमधून होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांना जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.