Bogibeel Bridge : देशातला सर्वात लांब पूल; रेल- रोड ब्रिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 14:52 IST2018-12-25T12:47:18+5:302018-12-25T14:52:22+5:30

ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांना जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब अशा रेल्वे-रस्ते पुलाचे (रेल- रोड ब्रिज) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (25 डिसेंबर) रोजी लोकार्पण करण्यात आले आहे.

आशियातील हा दुसरा सर्वात मोठा पूल तीनपदरी असणार आहे. तसेच येथे दुहेरी रेल्वे मार्गही असणार आहे. 4.94 किलोमीटर लांबीचा हा बोगिबील पूल आसाम व अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात आहे.

बोगिबील पुलावरुन 100 किलोमीटरच्या वेगाने रेल्वे धावू शकणार आहेत. हा पुल बनवण्यासाठी 5,800 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

ब्रह्मपुत्रा नदीवर बनवलेला हा पूल 42 खांबावर उभा आहे. बोगिबील पूल भुकंपग्रस्त भागात तयार करण्यात आला आहे. या पुलाच्या निर्माणात भूकंपविरोधी तंत्र वापरण्यात आले आहे.

चीनच्या सीमेवर असणार्‍या भारतीय लष्कराला रसद पोहचवण्याच्या दृष्टीने हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे. चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र दलांना तेजपूरहून युद्धसामग्री पोहोचविण्यासाठी या पुलाचे महत्त्वाचे योगदान असणार आहे.

दुरबगढहून अरुणाचलला गुवाहाटी मार्गावरून जायचे असल्यास तब्बल 500 किलोमीटरचे अंतर लागत होते. या पुलामुळे आता 100 किलोमीटरचे अंतर कमी झाले आहे.

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी 1997 साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर 2002 साली या पुलाचे काम सुरू झाले.