भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 17:22 IST2025-12-23T17:06:57+5:302025-12-23T17:22:44+5:30

Indian Railway Historic Achievement News: जगभरातील प्रगत देशांच्या रेल नेटवर्कना मागे टाकत भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक जागतिक विक्रम केल्याचे सांगितले जात आहे. सविस्तर जाणून घ्या...

Indian Railway Historic Achievement News: आताच्या घडीला भारतीय रेल्वेत अमूलाग्र बदल होताना पाहायला मिळत आहे. डिडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरपासून ते २० कोचच्या वंदे भारत ट्रेनपर्यंत भारतीय रेल्वेने अनेक मैलाचे दगड गाठले आहेत. हायस्पीड पेसेंजर ट्रेनपासून, ऑक्सिजन ते वेळेत शेतमालाच्या वाहतुकीपर्यंत अनेक मोठ्या गोष्टी भारतीय रेल्वेने साध्य करून दाखवल्या आहेत.

भारतीय रेल्वेची यंत्रणा हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. हजारो ट्रेन दररोज सेवा देत असतात. या ट्रेनचे नियोजन हाच एक मोठा टास्क मानला जातो. लाखो लोक दररोज भारतीय रेल्वेच्या विविध सेवांचा लाभ घेत असतात. अगदी मुंबईतील लोकल ट्रेनपासून ते भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या वंदे भारत ट्रेनपर्यंत प्रवासी प्रवास करत असतात.

भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांच्या निर्मितीतही अल्पावधीत मोठी झेप घेतली आहे. काही वर्षांपूर्वी डिझेल इंजिनांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेली भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक, ऊर्जा कार्यक्षम आणि खर्च-कपात करणाऱ्या विद्युत इंजिनांच्या माध्यमातून वेगाने वाटचाल करत आहे. इंधन आयातीवरील अवलंबन कमी होण्यासोबतच कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट होत असल्याचे म्हटले जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विद्युतीकरणामुळे रेल्वे गाड्यांचा वेग, वेळापत्रकाचे पालन आणि विश्वासार्हता वाढली आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि वेळेत सेवा मिळत असून माल वाहतुकीवरील खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढली आहे. विशेषतः कोळसा, सिमेंट, अन्नधान्य आणि औद्योगिक माल वाहतुकीत विद्युत इंजिनांमुळे मोठी सुधारणा झाली आहे.

देशभरातील १४ रेल्वे झोन आणि २५ राज्ये तसेच केंद्र शासित प्रदेशांमध्ये रेल्वे मार्गांचे ९९.२ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये प्रमुख औद्योगिक, व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीसाठी वापरात असलेल्या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. उर्वरित अल्प टक्केवारीतील मार्गांवरही विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, लवकरच संपूर्ण नेटवर्क अद्ययावत करण्याचे लक्ष्य गाठले जाणार आहे.

रेल्वे विद्युतीकरण हा भारताच्या हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. डिझेलच्या तुलनेत विद्युत इंजिनांमुळे दरवर्षी लाखो टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, भविष्यात सौर व पवनऊर्जेच्या माध्यमातून रेल्वेला स्वच्छ ऊर्जा पुरवण्याच्या दिशेनेही पावले उचलली जात आहेत.

भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक टप्पा गाठला असून, देशातील ब्रॉडगेज रेल्वे मार्गांच्या नेटवर्कपैकी ९९.२ टक्के मार्गांचे विद्युतीकरण आतापर्यंत पूर्ण करण्यात भारतीय रेल्वेला यश आले आहे.

या कामगिरीमुळे भारतीय रेल्वेने जगातील अनेक प्रगत देशांना मागे टाकले असून, युनायटेड किंगडम (३९ टक्के), फ्रान्स (६० टक्के) रशिया (५२ टक्के) आणि चीन (८२ टक्के), जपान (६४ टक्के) यांच्या तुलनेत भारत लक्षणीयरीत्या पुढे गेला आहे. ही उपलब्धी केवळ तांत्रिक यश नसून ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेलाही बळ देणारी आहे.

भारताला जागतिक रेल्वे नकाशावर अग्रगण्य स्थानावर नेणारी मानली जात आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ दरम्यान अनुक्रमे ७ हजार १८८ आणि २ हजार ७०१ किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण साध्य करण्यात आले आहे. सर्व नवीन मार्ग तसेच बहुमार्गीकरण प्रकल्पांना विद्युतीकरणासह मंजुरी दिली जात आहे.

२०१४ पूर्वी भारतीय रेल्वेने गेल्या ६० वर्षात सुमारे २१ हजार ८०१ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतर आजतागायत ४६ हजार ९०० किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेचे एकूण १८ विभाग असून, त्यापैकी १४ विभागांचे विद्युतीकरण १०० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित विभागातील विद्युतीकरण ९५ ते ९८ टक्क्यांपर्यंत झाले आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेच्या सर्वांत लोकप्रिय असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनने मोठा इतिहास घडवला आहे. गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. अल्पावधीत प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद या वंदे भारत ट्रेनला लाभला आहे.

भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी वंदे भारत ही केवळ एक ट्रेन नाही तर ती आत्मनिर्भर भारताचे प्रतीक बनली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या या स्वदेशी सेमी-हाय-स्पीड ट्रेनने गेल्या सहा वर्षांत लाखो प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. लवकरच स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे म्हटले जात आहे.