...तर सर्वसामान्यांचं सैन्यात जाण्याचं स्वप्न होणार साकार; लष्कर करतंय मोठा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 04:49 PM2020-05-13T16:49:44+5:302020-05-13T16:56:36+5:30

सैन्यात जाऊन देशसेवा करावी, असा विचार लहानपणी एकदा तरी प्रत्येकाच्या मनात आलेला असतो. मात्र नंतर हा विचार मागे पडतो. अशा अनेकांचं स्वप्न आता साकार होण्याची शक्यता आहे.

सैन्यातील शिस्त, त्यांचा गणवेश अनेकांना भुरळ घालतो. जवान कुठेही दिसला तरी मनात आदराची भावनाच उमटते.

आपणही सैन्यात जायला हवं होतं, असा विचार जवानांना पाहिल्यावर मनात येतो. असा विचार मनात येणाऱ्या अनेकांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय लष्कर सर्वसामान्य नागरिकांना सैन्यामध्ये सेवा करण्याची संधी देऊ शकतं. सर्वसामान्य नागरिकांना तीन वर्ष टूअर ऑफ ड्युटी देण्याच्या प्रस्तावावर सैन्याचा विचार सुरू आहे.

सर्वसामान्य भारतीयांना टूअर ऑफ ड्युटीच्या माध्यमातून लष्करात काम करण्याची संधी देण्याचा विचार असल्याचं वृत्त नवभारत टाईम्सनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे.

भारतीय लष्कराला देशातल्या सर्वोत्तम प्रतिभेला सैन्यात स्थान द्यायचं आहे. टूअर ऑफ ड्युटीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास त्याला गती मिळेल.

सध्याच्या घडीला शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून लष्करात रूजू होणाऱ्यांना कमीत कमी १० वर्षे देशसेवा करावी लागते. यापेक्षा कमी कार्यकाळ असलेली सेवा सध्या तरी उपलब्ध नाही.

लष्करातील वरिष्ठ अधिकारी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील तरतुदींचा फेरविचार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील तरतुदींमध्ये बदल केला गेल्यास जास्तीत जास्त तरुण याकडे आकर्षित होतील, असं लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटतं.

भारतीय सैन्याला गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लवकरात शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आधी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये ५ वर्षांच्या किमान सेवेची तरतूद होती. मात्र त्यानंतर ती १० वर्षे करण्यात आली.