७ बाईक, ४० जवान, २०.४ फूट उंच मानवी मनोरा; भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हिल्सचा कर्तव्य पथावर विश्वविक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:36 IST2025-01-20T17:29:36+5:302025-01-20T17:36:28+5:30
Indian Army Daredevils: भारतीय सैन्याच्या मोटरसायकल रायडर डिस्प्ले टीम डेअरडेव्हिल्सने २० जानेवारी २०२५ रोजी कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे मोटारसायकल चालवताना सर्वात उंच मानवी मनोऱ्याचा जागतिक विक्रम करून अभूतपूर्व कामगिरी केली.

भारतीय लष्कराची मोटरसायकल रायडर टीम डेअरडेव्हिल्स प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर परेड करणार आहे. याची सध्या जोरदार तयारी सुरु आहे.
डेअरडेव्हिल्स या टीमने २० जानेवारी रोजी कर्तव्य पथावर एक पराक्रम केला, ज्या अंतर्गत ४० सैनिकांनी सात मोटरसायकलवर २० फूट उंचीचा मानवी मनोरा तयार केला.
भारतीय सैन्याच्या डेअरडेव्हिल्स टीमने विजय चौक ते इंडिया गेट असे एकूण दोन किलोमीटरचे अंतर या २० फुटांच्या मानवी मनोऱ्यासह कापले.
डेअरडेव्हिल्स टीम ही भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ सिग्नल्सचा एक ऐतिहासिक टीम आहे, ज्यांनी आपल्या अतुलनीय कौशल्य आणि कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली आहे.
या ताज्या कामगिरीसह, डेअरडेव्हिल्स टीमकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसह एकूण ३३ जागतिक विक्रम आहेत.
या डेअरडेव्हिल्सचे इंडिया गेटवर सिग्नल्स फ्रेटरनिटीच्या सदस्यांनी भव्य स्वागत केले. कॉर्प्स ऑफ सिग्नल्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल केव्ही कुमार यांच्या उपस्थितीत टीमला प्रोत्साहन देण्यात आले.
१९३५ मध्ये स्थापन झालेल्या डेअरडेव्हिल्स टीमने आतापर्यंत भारतभर १,६०० हून अधिक मोटरसायकल प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत. प्रजासत्ताक दिन परेड, आर्मी डे परेड आणि अनेक लष्करी कार्यक्रम यासारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये त्यांच्या कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यांची वचनबद्धता आणि अद्वितीय कौशल्ये यांनी केवळ भारतीय सैन्याची क्षमताच दाखवली नाही तर लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे.