रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 23:41 IST2025-05-09T23:35:21+5:302025-05-09T23:41:57+5:30

India Pakistan War Operation Sindoor: रशियाने युक्रेनवर रात्रीच हल्ले केले होते. भारतानेही पाकिस्तानवर रात्रीचेच हल्ले केले आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार वार-पलटवार सुरु झाले आहेत. भारताचे ड्रोन मध्यरात्री पाकिस्तानात घुसून तांडव करत आहेत. तर पाकिस्तानचे ड्रोन रात्रीचेच भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसा सगळे सुशेगाद असल्यासारखे वातावरण असते. अंधार पडला की दोन्ही बाजुचे सैन्य ड्रोन, मिसाईल हल्ले करत आहेत. यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दोन दिवसांपूर्वीच भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. यामुळे पाकिस्तान खवळला आहे, जे दहशतवादी मारले गेले त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे बडे अधिकारी उपस्थित होते. यावरून पाकिस्तान आणि दहशतवादी किती एकत्र आहेत, हे जगाच्या लक्षात आले आहे. दोन्ही देशांकडून रात्रीच्यावेळीच हल्ले करण्यामागे काही कारणे आहेत. जाणून घेऊया...

सर्वात महत्वाचे म्हणजे रात्रीच्या अंधारात क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सहज दिसत नाहीत. बऱ्याचदा रडार देखील त्यांना शोधू शकत नाहीत. नागरिक रात्रीच्यावेळी घरात राहतात, यामुळे त्यांनाही ते दिसत नाहीत.

जर शत्रूवर रात्री हल्ला झाला तर तो तात्काळ प्रत्युत्तर देऊ शकत नाही. तयारीशिवाय अंधारात ऑपरेशन करणे देखील कठीण असते. याचा फायदा घेतला जातो.

रात्रीच्या वेळी तयारी करून हल्ला केला तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक लक्ष्य भेदता येते. लढाऊ विमाने नाईट व्हिजन, थर्मल इमेजिंग आणि जीपीएस गाईडेड क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतात, यामुळे लक्ष्यावर मारा करता येतो. पूर्वी असे करता येत नव्हते.

हवाई हल्ल्यात मोठ्या संख्येने नागरिक मारले गेले तर कोणत्याही देशावर जागतिक स्तरावर टीका होते. त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती कमकुवत होते. यामुळे देश रात्रीच्यावेळीच हल्ले करणे योग्य समजतात. रशियाने युक्रेनवर रात्रीच हल्ले केले होते. भारतानेही पाकिस्तानवर रात्रीचेच हल्ले केले आहेत.