भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 14:43 IST2025-08-03T14:38:33+5:302025-08-03T14:43:50+5:30

Rare earth Metals Found in India: कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी संसदेत ही माहिती दिली.

गेल्या काही महिन्यांपासून चीनने भारताला नामोहरम करून सोडले आहे. देशातील ऑटोमोबाईल सेक्टरला वाहन निर्मितीसाठी लागणारे रेअर अर्थ मेटल देण्यास चीनने नकार दिलेला आहे. चीनने दुर्मिळ पृथ्वी घटकांची निर्यात थांबविली आहे. एकट्या अमेरिकेने चीनसोबत विद्यार्थ्यांच्या बदल्यात रेअर अर्थ मेटलची डील केली आहे. यामुळे भारतासह जगभरातील देश चिंतेत असताना आता भारताच्या हाती याच रेअर अर्थ मेटलचा खजिना लागल्याची घोषणा संसदेत करण्यात आली आहे.

भारतातील आयफोनचे उत्पादन सुरु झाल्यानंतर चीनने हा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. प्रामुख्याने चुंबक, बॅटरी बनविण्यासाठी या रेअर अर्थ मेटलचा वापर होतो. हे धातू नावाप्रमाणेच दुर्मिळता दुर्मिळ असतात. जगातील बहुतांश दुर्मिळ धातू हे चीन उत्पादित करतो. यामुळे आजवर जगभरातील देश चीनवर अवलंबून होते. आता चीनची ही दादागिरी संपुष्टात येणार आहे.

कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी संसदेत ही माहिती दिली. दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या (REEs) क्षेत्रात भारताला मोठे यश मिळाले आहे. देशात ऊर्जा राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंगरौली कोळसा क्षेत्रात दुर्मिळ खनिजांचा मोठा साठा सापडला आहे. चीनने दुर्मिळ पृथ्वी धातूंच्या निर्यातीवर बंदी घालून भारतातील अनेक उद्योगांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगरौली कोळसा क्षेत्रात कोळसा आणि कोळसा नसलेल्या नमुन्यांमध्ये २५० पीपीएम आणि ४०० पीपीएम आरईई आढळली असल्याचे ते म्हणाले.

भारतात दुर्मिळ पृथ्वी धातूंचे साठे सापडणे हे जॅकपॉटपेक्षा काही कमी नाही. देशातील इलेक्ट्रॉनिक्स, वाहतूक आणि हरित ऊर्जा उद्योगांचे दुर्मिळ पृथ्वीसाठी चीनवरील अवलंबित्व संपणार आहे. स्मार्टफोनपासून ते इलेक्ट्रिक वाहने, लढाऊ विमाने, उपग्रहांपर्यंत, आज प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानात याची आवश्यकता आहे.

भारतात हे रेअर अर्थ मेटल विपुल प्रमाणात आहेत. भारतात सुमारे ७.२३ दशलक्ष टन एवढे रेअर अर्थ मेटल आहेत. आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र या ठिकाणी दुर्मिळ धातू सापडले आहेत. परंतू ते सध्या विकासाच्या पहिल्या टप्प्यात आहेत. या शक्तीवर भारत भविष्यात जगासाठी सर्वात शक्तीशाली देश ठरू शकतो.

जगातील सुमारे ९०% दुर्मिळ पृथ्वी धातूंचे (आरईई) शुद्धीकरण आणि प्रक्रिया चीन नियंत्रित करते. परंतू, ते त्यांच्याकडे सापडत नाहीत. ते दुसऱ्या देशातून आयात केले जातात आणि मग त्यावर प्रक्रिया केली जाते. लेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बॅटरी, सौर पॅनेल, पवन टर्बाइन, मोबाईल फोन, लॅपटॉप, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रे त्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत. थोडक्यात रेअर अर्थ मेटल हा या उद्योगांचा आत्मा आहे.