भारतीय सैन्याची ताकत वाढणार, क्षेपणास्त्र खरेदीसाठी सरकारला पाठवला 14,000 कोटींचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:09 PM2021-08-30T22:09:24+5:302021-08-30T22:15:31+5:30

Indian army make in india: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लवकरच या प्रस्तावाबाबत उच्चस्तरीय बैठकी घेतील अशी अपेक्षा आहे.

नवी दिल्ली: 'मेक इन इंडिया'ची ताकद वाढवण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय लष्करानं एक मोठा करार करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय लष्कर 14,000 कोटी रुपयांमध्ये स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे.

मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय लष्कर आकाश-एस हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या 2 रेजिमेंट आणि 25 प्रगत लाइट हेलिकॉप्टर खरेदी करेल. यासाठी भारतीय लष्करानं केंद्र सरकारला एकूण 14000 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय लष्करानं संरक्षण मंत्रालयाला 14 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. लष्कराचा हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊ शकतो.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लवकरच या प्रस्तावाबाबत उच्चस्तरीय बैठकी घेतील अशी अपेक्षा आहे. आकाश-एस क्षेपणास्त्र हे स्वदेशी शस्त्र आहे, तसेच आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे नवीन रूप आहे.

आकाश-एस 25 ते 30 किमी अंतरावरून शत्रूची विमानं आणि क्रूझ क्षेपणास्त्रांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. विशेष गोष्ट म्हणजे लडाखसारख्या अत्यंत थंड हवामानात ही क्षेपणास्त्रं शत्रूंना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत.

अशा परिस्थितीत आकाश-एस क्षेपणास्त्रं चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील डोंगराळ आणि इतर भागात भारतीय लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करतील.

BDL ने IAF ला आकाश क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी करार केला. यापूर्वी भारत डायनॅमिक्स लिमिटेडनं भारतीय हवाई दलाला आकाश क्षेपणास्त्रांच्या निर्मिती आणि पुरवठ्यासाठी संरक्षण मंत्रालयासोबत सुमारे 499 कोटी रुपयांचा करार केला होता.

नवी दिल्ली येथे बीडीएलचे संचालक पी.राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या दरम्यान, एअर कमोडोर, गाईडेड वेपन्स मेंटेनन्स, भारतीय हवाई दलाचे अजय सिंघल आणि बीडीएलचे कमोडोर टीएन कौल (निवृत्त) कार्यकारी संचालक उपस्थित होते.