वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 19:46 IST2025-05-05T19:33:57+5:302025-05-05T19:46:00+5:30

Traffic Rule Violation:आता रस्ते वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे.

देशभरातील वाहतूक प्रणाली सुरळीत चालावी यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक विभाग सातत्याने प्रयत्न करत असतो. वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम कठोर करण्यासह दंडाची रक्कम वाढवण्यापर्यंतचे अनेक उपाय करण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेक जण वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवताना दिसतात. मात्र आता रस्ते वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसनमध्ये निगेटिव्ह पॉईंट सिस्टिम सुरू करण्याची योजना आखली आहे. यानुसार वेगाने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे आणि बेदरकारपणे वाहन चालवणे, अशा नियमभंगांसाठी ड्रायव्हरांना त्यांच्या लायसनमध्ये नकारात्मक गुण दिले जाण्याचा प्रस्ताव आहे.

ही नकारात्मक गुण प्रणाली कुठल्याही परीक्षेमध्ये मिळणाऱ्या निगेटिव्ह मार्किंगप्रमाणे काम करेल. म्हणजेच वाहन चालकाने एका निश्चित कालमर्यादेमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करेल, त्यासाठी ड्रायव्हिंग लायसनवर तेवढेच निगेटिव्ह गुण नोंदवले जातील. जेव्हा हे निगेटिव्ह गुण निश्चित केलेल्या गुणांपेक्षा अधिक होतील तेव्हा ड्रायव्हिंग लायसन सस्पेंड किंवा रद्द करण्यात येईल.

प्रस्तावित डिमेरिट आणि मेरिट सिस्टिमनुसार ड्रायव्हरांना ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनासाठी निगेटिव्ह पॉईंट दिले जातील. तर चांगल्या ड्रायव्हिंगसाठी पॉझिटिव्ह पॉईंट दिले जाऊ शकतात.

जर कुठल्याही वाहन चालकाने वाहतूक परवान्यावर तीन वर्षांच्या आत १२ निगेटिव्ह पॉईंट्स जमा झाले तर त्याचा परवाना रद्द करण्यात यावा, तसेच नियमांचं वारंवार उल्लंघन होत राहिल्यास वाहतूक परवाना पाच वर्षांसाठी रद्द करण्याचा प्रस्ताव आहे, २०११ साली एका तज्ज्ञांच्या समितीने ही शिफारस केली होती. मात्र नव्या पॉईंट सिस्टिमसाठी अचूक कालमर्यादेस अंतिम रूप देणं अद्याप बाकी आहे.

या नव्या सिस्टिमचा थेट परिणाम ड्रायव्हिंग लायसन्सच्या रिन्युअल करण्यावरही पडणार आहे. वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाची पार्श्वभूमी असलेल्या ड्रायव्हरांना आपल्या परवान्याचं नुतनीकरण करताना पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल.