शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:15 IST

1 / 12
Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे.
2 / 12
भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. गेल्या वेळी ४३ जागांवर मर्यादित राहिलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने यंदा ८५ जागांवर यश मिळविले आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही २९ जागांपैकी १९ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचा स्ट्राइक रेट जवळपास ८९ टक्के तर जदयूचा ८५ टक्क्यांच्या आसपास आहे.
3 / 12
बिहारमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपाची आता किती राज्यात सत्ता आहे, याची आकडेवारी समोर आली आहे. बिहार निवडणुकीतील यशानंतर भाजपा आणि एनडीए आता १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्तेत आहे. यातून हे स्पष्ट होते की देशातील महत्त्वाची राज्ये ही भाजपच्या ताब्यात आहेत.
4 / 12
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सत्ता आहे.
5 / 12
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपा सत्तेपासून दूर आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर, लडाख, मणिपूर, मिझोराम आणि सिक्कीममध्येही भाजपाला सत्ता मिळवता आलेली नाही. भाजपा दक्षिण भारतात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी द्रमुक, काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांची ताकद जास्त आहे.
6 / 12
बिहारप्रमाणेच पश्चिम बंगालमधूनही आम्ही ‘जंगलराज’ हटविणारच असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ज्याप्रमाणे गंगा नदी बिहारमार्गे बंगालमध्ये पोहोचते, त्याप्रमाणे बिहारच्या विधानसभा निवडणुकांतील विजयाने पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे असेही त्यांनी सांगितले.
7 / 12
बिहारच्या विधानसभा निवडणुकांतील विजयाने नवीन ‘एमवाय - महिला आणि युवा’ हा फॉर्म्युला दिला असून, जनतेने जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिक एमवाय फॉर्म्युल्याचा धुव्वा उडवला आहे. भारताला ‘लोकशाहीची जननी’ असल्याचा मान बिहारच्या भूमीमुळे मिळाला. याच भूमीने लोकशाहीवर हल्ले करणाऱ्यांना धूळ चारली आहे.
8 / 12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर या वेळी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, खोट्यांचा सपशेल पराभव होतो व सत्य बाजू मांडणारे लोकांचा विश्वास जिंकतात, हे बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिले आहे. पश्चिम बंगालमधूनही आम्ही ‘जंगलराज’ हटविणारच असे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले.
9 / 12
बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ ऑक्टोबरला समाजवादी नेता आणि भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचे जन्मस्थळ समस्तीपूर येथे पहिली सभा घेतली. त्यांनी आपल्या भाषणांतून बिहारी अस्मितेला साद घातली. ३० ऑक्टोबरला मोदींनी मुजफ्फरपूर व छपरा, त्यानंतर नवादा, आरा येथे सभा घेतल्या. ३ नोव्हेंबरला त्यांनी कटीहार, सहरसा, ६ नोव्हेंबरला अररिया, भागलपूर ७ ला भभुआ, औरंगाबाद, ८ नोव्हेंबरला बेतिया, सीतामढी येथे प्रचारसभा झाल्या.
10 / 12
दरम्यान, लोकसभेत ९९ जागा मिळाल्यावर काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला होता. परंतु त्यानंतर गेल्या दीड वर्षांत झालेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड वगळता काँग्रेसची घसरणच झाली आहे. महाराष्ट्र, हरियाणाच्या निवडणुकांमधील मतचोरीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोपांची राळ उठवली असली तरी त्याचा बिहारमधील मतदारांवर काही प्रभाव पडलेला दिसत नाही.
11 / 12
बिहारमध्ये अधिक जागा पदरात पाडून घेऊनही काँग्रेसला जेमतेम सहा जागा मिळाल्या. बिहारमधील मतदारांनी महागठबंधनला नाकारले पण त्याच वेळी काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. उत्तर भारतात काँग्रेसची पिछेहाट कायम असून, जनाधार स्वत:कडे वळविण्यात राहुल गांधी यांना अजूनही यश मिळालेले नाही. बिहारमध्ये काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
12 / 12
पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला फक्त केरळमध्ये सत्तेची आशा आहे. तमिळनाडूत काँग्रेस दुय्यम भूमिकेत आहे. पश्चिम बंगालमध्ये काहीही ताकद राहिलेली नाही. आसाममध्ये अल्पसंख्याक मतांवर पक्षाची अधिक भिस्त आहे. केरळमध्येच सत्तेची संधी मिळू शकते. पण गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसला एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान नेतृत्वासमोर आहे, असे म्हटले जात आहे.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी