न भूतो! देशात पहिल्यांदाच हिंगाची लागवड; किंमत 35000 रुपये किलो

By हेमंत बावकर | Published: October 20, 2020 01:43 PM2020-10-20T13:43:58+5:302020-10-20T13:47:45+5:30

Hing farming in India: अफगाणिस्तानमधून आणण्यात आलेल्या हिंगाच्या बियांचे पालमपूर स्थित हिमालय जैवविविधता प्रक्रिया संस्थेमध्ये वैज्ञानिक पद्धतीने रोपटी बनविण्यात आली आहेत.

औषधी गुणांनी युक्त आणि प्रत्येक घरामध्ये आढळणारा हिंग आपल्या सर्वांना परिचित आहेच. जगात जेवढा हिंग उत्पादित होतो त्याच्या निम्मा भारतात खपतो. अशा या प्रचंड मागणी असलेल्या हिंगाची शेती मात्र कधीही भारतात झाली नाही. पण तो दिवस उजाडला आहे. भारतात पहिल्या हिंगाच्या रोपट्याची 17 ऑक्टोबरला लागवड करण्यात आली.

अफगाणिस्तानमधून आणण्यात आलेल्या हिंगाच्या बियांचे पालमपूर स्थित हिमालय जैवविविधता प्रक्रिया संस्थेमध्ये वैज्ञानिक पद्धतीने रोपटी बनविण्यात आली आहेत.

या रोपट्यांची लागवड लाहौल स्पीतीच्या जिल्ह्यात केली जात आहे. आयएचबीटीचे हे प्रयत्न यशस्वी झाले तर तेथील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत.

सध्या तेथील केवळ 7 शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर हे हिंगाचे रोपटे देण्यात आले आहेत. क्वारिंगचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रिगजिन ह्यरपा यांच्या शेतात हिमालय जैवविविधता प्रक्रिया संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार यांनी पहिले रोपटे लावले.

देशात याआधी हिंगाची शेती होत नव्हती. कारण त्यासाठी थंड ठिकाण आणि अन्य नैसर्गिक गोष्टींची गरज होती. अफगाणिस्तानमधून बिया आणून प्रक्रियाकरत ही रोपटी उगवली आहेत. देशात वार्षिक खप 1200 टन आहे. अफगाणिस्तानातून 90 टक्के, उज्बेकिस्तानातून 8 आणि इराणहून 2 टक्के हिंग दरवर्षी आयात केला जातो, असे ते म्हणाले.

पालमपूरच्या संशोधन संस्थेमध्ये हिंगाच्या रोपट्यांच्या सहा प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून संशोधन केल्यानंतर लाहौल घाटीची जागा हिंगासाठी अनुकूल असल्याचे दिसून आले. याशिवाय उत्तराखंडच्या डोंगररांगा, लडाख, किन्नौर आणि जनझेलीच्या डोंगररांगा हिंगासाठी चांगल्या असल्याचे आढळल्या आहेत.

हिंगाच्या शेतीसाठी 20 ते 30 डिग्री तापमान असणे गरजेचे आहे. लाहौलमध्ये चार गावांतील ७ शेतकऱ्यांना ही रोपटी देण्यात आली आहेत. 8 एकर क्षेत्रामध्ये ही लागवड होणार आहे.

हिंगाचे उत्पादन हे वर्षांनी येणार आहे. हिंगाच्या रोपट्याची मुळे तयार झाली की त्या रोपट्याला बिया येणार आहेत. हिमालयाच्या वरील भागात हिंगाची शेती होईल असा अंदाज डॉ. अशोक कुमार यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात हिंगाची किंमत 35000 रुपये प्रति किलो आहे. भारत सर्वाधिक आयात करणारा देश आहे.

हिमालयाच्या भागात हिंगाचे उत्पादन सुरु झाल्यास तेथील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.

टॅग्स :शेतकरीFarmer