Harshad Mehta : मुंबईत फक्त चाळीस रुपये घेऊन आला अन् केला 5 हजार कोटींचा घोटाळा ?

By पूनम अपराज | Published: October 20, 2020 05:22 PM2020-10-20T17:22:11+5:302020-10-20T17:39:17+5:30

Harshad Mehta : हर्षद शांतीलाल मेहता गुजरातमधल्या राजकोटमधील एका सामान्य कुटुंबात जन्माला आला होता. त्याचा बालपणातील काही काळ कांदिवलीमध्ये गेला. त्याच्या वडिलांची बदली रायपुरला झाल्यानंतर हर्षद कुटुंबासोबत छत्तीसगडला गेला. १९५४ साली जन्मलेला हर्षदचं रायपूरच्या शाळेत शिक्षण झालं.

अशी चर्चा आहे की, शाळेत जेमतेम असा विद्यार्थी असलेला हर्षद फारसा हुशार नव्हता. एकदा त्याला शाळेतून काढले देखील होते. त्यानंतर रायपूरहून काहीच वर्षात मुंबईतून शिक्षण घ्यायचं म्हणून खिश्यात चाळीस रुपये घेऊन तो मुंबईत B.com ही पदवी घेण्यासाठी आला. तसेही ही चाळीस रुपयांची रक्कम त्याकाळी काही कमी नव्हती. लाला लजपतराय कॉलेजातून त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हर्षदने कपडे आणि इलेक्ट्रिकल उपकरणं विकण्याची नोकरी केली. नंतर त्याने न्यू इंडिया अश्युरंस कंपनीत सेल्स पर्सन म्हणून नोकरी स्वीकारली. प्रचंड महत्वकांक्षी असणारा हर्षद मेहता कोणतिही रिस्क घ्यायला तयार असायचा. तो कोणतिही नवीन सिस्टम तात्काळ शिकून घ्यायचा.

आठ वर्ष तो ठिकठिकाणी नोकरी करत होता. याच काळात त्याला शेअर मार्केटमध्ये आवड निर्माण झाली. नंतर काही शेअर दलालांकडे काम केल्यानंतर १९८४ साली हर्षद मेहताने स्वतःची स्टॉक मार्केट ब्रोकरेज कंपनी 'ग्रो मोर रिसर्च अँड ऍसेट मॅनेजमेंट' सुरु केली.

२३ एप्रिल १९९२ चा दिवस त्याच्यासाठी काळा दिवस ठरला. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीने देशभरात खळबळ माजवली होती. ती बातमी चार हजार कोटींचा घोटाळा उघड करणारी होती. घोटाळा झाला होता तो शेअर मार्केटमध्ये. ही बातमी ब्रेक केली होती ती पत्रकार सुचेता दलाल यांनी. त्या दिवशी हर्षद मेहता या नावाचा बोलबाला झाला.

सरकारला काही सरकारी कामासाठी पैसे उभारायचे असल्यास ते बॉन्डद्वारे पैसे उभे केले जातात. सर्व बँकांना सरकारी बॉन्डमध्ये ठराविक रक्कम गुंतवणे बंधनकारक होते. सरकार बॉन्ड्स घेणाऱ्या सर्वांना काही व्याज ही देतं. जेव्हा एखाद्या बँकेला पैशांची गरज पडायची तेव्हा त्या बँकेकड़े असलेले सरकारी बॉन्ड्स ती बँक दुसऱ्या बँकेला विकत असे आणि अल्पावधीसाठी काही व्याजदराने कर्ज घेत असे. पैसे आल्यावर पहिली बँक तो बॉन्ड दुसऱ्या बँकेकडून परत विकत घेत असे. ह्याला ब्रोकिंगच्या भाषेत रेडी फॉरवर्ड डील' असे म्हटले जायचे. अल्पावधीसाठी लागणाऱ्या पैश्यांची या प्रकारामुळे लगेचच सोय होत असे. याचाच फायदा हर्षद मेहताने घेतला आणि ४ हजार कोटींचा घोटाळा केला. ज्या बँकेला बॉन्ड्स विकायचे असायचे तिला ग्राहक म्हणजेच दुसरी बँक शोधण्याचे काम काही ब्रोकर्स करत असत. हर्षद मेहता तसाच एक ब्रोकर होता.

हर्षदला ही सर्व सिस्टीम बरोबर माहित होती. त्याने त्याचा फायदा घ्यायचे ठरवले. त्याचं झालं असं की जेव्हा बँकेला बॉन्ड विकायचा असायचा तेव्हा हर्षद मेहता मी तुम्हाला बॉन्ड घेणारी बँक शोधून देतो म्हणून तो बॉन्ड बँकेकडून घ्यायचा. तो बँकेला काही दिवसांचा वेळ ही मागून घ्यायचा. परत हर्षद बॉन्ड विकत घेणाऱ्या बँकेत जायचा अणि तुम्हाला विक्रेता शोधून आणतो म्हणून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा परत त्या बँकेकडे देखील काही दिवसांचा कालावधी मागायचा.

सरकार आपल्या योजनांसाठी भांडवल उभा करताना सरकारी बॉण्ड विक्रीसाठी उपलब्ध करतात. तेव्हाच्या राष्ट्रीय बँकांना अशा बॉण्डमध्ये गुंतवणूक करणे बंधनकारक होते. पैशांची गरज असेल तर बँका त्यांच्या ताब्यातील बॉण्ड पावतीच्या स्वरूपात दुसऱ्या बँकेकडे तारण ठेऊन व्याजावर पैसे घेत.

नंतर व्याजावर घेतलेले पैसे परत करून बॉण्ड सोडवून घेत. याला रेडी फॉरवर्ड डील (आरएफ डील) म्हणतात. त्यासाठी अल्प मुदतीच्या कर्जासाठी दोन बँकांमध्ये सामान्यतः रेडी फॉरवर्ड डीलचा वापर व्हायचा. हर्षद मेहता मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठ्या घोटाळ्यासाठी कुख्यात आहे. 

Read in English