दिलासादायक! सरकारने लॉन्च केलं कोविड-19 लसीकरण ट्रॅकर, रिअल टाईम अपडेट पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 01:25 PM2021-01-20T13:25:04+5:302021-01-20T13:37:36+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्र सरकारच्या वतीने कोरोना लसीकरणाच्या संबंधित एका नवीन ट्रॅकरचे लॉन्चिंग करण्यात आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,05,95,660 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,52,718 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,823 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 162 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी देश सध्या सज्ज झाला आहे.

जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांत कोरोना लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मोठ्या राज्यांत आठवड्यातील चार दिवस तर लोकसंख्या कमी असलेल्या लहान राज्यांत दोन दिवस लसीकरणासाठी निश्चित करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने कोरोना लसीकरणाच्या संबंधित एका नवीन ट्रॅकरचे लॉन्चिंग करण्यात आलं आहे. या ट्रॅकरला MyGov या वेबसाईटवर इंटीग्रेटेड करण्यात आलं आहे. त्यामुळे आता देशातील किती लोकांना कोरोना लस देण्यात आली तसेच लसीकरणा संबंधित सर्व प्रकारच्या माहितीचे रियल टाइम अपडेट्स मिळणार आहेत.

MyGov या वेबसाईटवरुन रोजच्या रोज कोरोनाच्या लसीकरणासंबंधी टेस्टिंग स्टेट्स आणि अ‍ॅक्टिव्ह केसेसचे रियल टाईम स्टेट्स देण्यात येत आहे. कोरोनाविरोधात कशा प्रकारची पावले उचलण्यात येत आहेत याची माहिती ही राज्यवार आकडेवारीही देण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या वतीने लसीकरणासाठी नोंदणी करणे तसेच लोकांपर्यंत लसीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती पोहचवण्यासाठी 'को-विन' नावाचे एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. कोरोनाच्या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी या अ‍ॅपवर नोंदणी करणे आणि महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

को-विन अ‍ॅपमध्ये माहिती भरताना मात्र अनेकांना अडचणी येताना दिसत आहेत. सोमवारी काही राज्यांमध्ये को-विन अ‍ॅपबद्दल तक्रारी आल्या. थोड्या वेळाने हे अ‍ॅप पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती मिळत आहे.

पंजाब आणि हरियाणा या राज्यांनी लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी को-विन अ‍ॅपच्या वापराच्या नियमांना सुलभ केलं आहे. या दोन राज्यातील आरोग्य विभागाने लसीकरणासाठी आवश्यक नोंदणीकरणाशिवाय हे अभियान पुढे नेण्यास मंजूरी दिली आहे.

लसीकरण करण्यात आलेल्या लोकांचा मॅन्युएल स्वरुपातील डेटा नंतर अपलोड करण्यात येणार असल्याचं या दोन राज्यांनी स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील कोणत्या राज्यात कधी, कुठे, केव्हा कोरोना लसीकरण होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यांनी त्यांच्या सोयीनुसार लसीकरणाचे दिवस ठरवले आहेत. त्यानुसार लसीकरण सुरू आहे.

संपूर्ण देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम राबवली जात आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून देशात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.