Fitness Challenge : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फिटनेस मंत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 14:12 IST2018-06-13T14:12:28+5:302018-06-13T14:12:28+5:30

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं दिलेलं फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. 1 मिनिट 49 सेकंदाचा व्हिडीओ त्यांनी बुधवारी(13 जून) सकाळी ट्विटरवर शेअर केला.

''पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवरून मी दररोज सकाळी चालतो. त्यामुळे खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटते'', असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी निरनिराळे प्राणायाम आणि योगासनं करताना दिसत आहेत.

मोदींनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले असून झाडाभोवती वर्तुळाकार कक्षेत बनवलेल्या ट्रॅकवरुन ते चालताना दिसले. योगाव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी व्यायाम करतानाही दिसत आहेत.

या ट्रॅकचे वेगवेगळे भाग करण्यात आले असून त्यामध्ये हिरवळ, माती, दगडगोटे, पाणी आणि रेती ठेवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि टेनिसपटू मनिका बत्राला फिटनेस चॅलेंज दिलं आहे.

22 मे रोजी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसचं महत्त्व पटवून देण्यासाठी सोशल मीडियावर फिटनेस चॅलेंजची मोहीम सुरू केली.