भारतातील पहिलं मेटाव्हर्स वेडिंग रिसेप्शन; नवरीचे दिवंगत पिताही होणार सहभागी, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 08:53 PM2022-01-18T20:53:25+5:302022-01-18T21:07:10+5:30

Tamil Nadu Metaverse wedding: कोरोनामुळे लग्नसमारंभावर निर्बंध आले आहेत. पाहुण्यांच्या संख्येवर बंधन आली आहे. त्यात फेसबुकच्या मेटाव्हर्सच्या माध्यमातून आभासी पद्धतीने भारतात पहिल्यांदाच वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे.

कोरोनामुळे लग्नसोहळ्यावर अनेक निर्बंध आले आहेत. ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बहुतांश राज्यांनी नियम कडक करुन लग्नसोहळे, कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. त्यात तामिळनाडूतील एका कपल्सनं नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं लग्न करण्याचं प्लॅनिंग बनवलं आहे.

तामिळनाडूत भारतातील पहिलं मेटाव्हर्स लग्नाचं रिसेप्शन पार पडणार आहे. ज्यात अनेक पाहुणे मंडळी सहभागी होणार आहे. याबाबत नवरदेवाने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. येत्या ६ फेब्रुवारीला भारतात पहिलं असं लग्न होणार आहे.

दिनेश एसपी आणि जनगानंदिनी रामास्वामी फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी तामिळनाडूतील शिवलिंगपुरम गावात लग्न करतील. परंतु त्या लग्नाचं रिसेप्शन डिजिटल माध्यमातून होणार आहे. कोरोनामुळे लग्नावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे जोडप्यांनी रिसेप्शनसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हॉगवर्ट्स थीम असणार आहे. त्यात व्हर्चुअल प्रवेश करण्यासाठी लॅपटॉपवर ऑनलाईन राहावं लागेल. जगभरातील त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यही या सोहळ्याला हजर असतील. ट्विटरवर याचा एक व्हिडिओ नवऱ्याने शेअर केला आहे. ज्यात हे रिसेप्शन कसं असेल ते दाखवलं आहे.

या लग्नाचं वैशिष्टं म्हणजे या रिसेप्शनमध्ये नवरीचे दिवंगत वडील व्हर्चुअल माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. हे मेटाव्हर्स लग्न तंत्रज्ञानाचा नवा अविष्कार आहे. भारतात पहिल्यांदाच मेटाव्हर्स शानदार कार्यक्रमाचं या माध्यमातून आयोजन होणार आहे.

नवरी नगानंदिनी एक सॉफ्टवेअर डेवलपर आहे तर दिनेश आयटी क्षेत्रात काम करतो. मेटाव्हर्स वेडिंग रिसेप्शनचा विचार दिनेशच्या मनात आला त्यानंतर हा प्लॅन नगानंदिनीलाही आवडला. मागील वर्षभरापासून यावर दिनेश काम करत आहे.

हे जोडपे पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर भेटले होते. लग्नाच्या रिसेप्शनसाठी मेटाव्हर्स इवेंटपेक्षा आणखी दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही असं दिनेशला वाटतं. अनेक अडचणीनंतर अखेर कुटुंबाला राजी करण्यात दिनेशला यश आलं. हे कपल्स कृष्णागिरी जिल्ह्यात शिवलिंगपुरम येथे गावात लग्न करणार आहे.

नवरा-नवरी दोघं हॅरी पॉटरचे फॅन आहेत. त्यामुळे हॉगवार्ट किल्ला रिसेप्शनसाठी थीम ठेवली आहे. ६ फेब्रुवारीला लग्नानंतर रिसेप्शनला दोघंही पारंपारिक वेशभुषेत हजर राहतील. नातेवाईकांना लिंक आणि पासवर्ड दिले जातील. ज्यात ते अवतार निवडतील.

सर्व अवतार एकमेकांना भेटतील. त्यांच्याशी बोलतील. यूजर्स बनावट अवतार घेत एकमेकांशी बोलू शकतात. गिफ्ट वाऊचर अथवा गुगल पे ने पैसे पाठवू शकतात. परंतु या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट नसणार ती म्हणजे भोजन. मेटाव्हर्स म्हणजे व्हर्चुअल रिएलिटी आणि व्हिडीओ टूलचा वापर केला जातो.

यात लोकं एकमेकांशी डिजिटली कनेक्ट राहतात. सोप्प्या शब्दात तुम्ही घरात असाल परंतु तुमचा अवतार मेटावर्समध्ये असेल. ज्याला तुम्ही कंट्रोल करू शकता. या मेटाव्हर्सच्या जगात तुमचा डिजिटल अवतार सर्वकाही करेल.

मागील वर्षी अमेरिकेत ट्रेसी व डेवने मेटाव्हर्सच्या माध्यमातून पहिलं लग्न केले होते. परंतु कायद्यानुसार अमेरिकेत हे मान्य नाही. भारतात हे पहिल्यांदाच होत आहे. मेटाव्हर्सच्या माध्यमातून वास्तविक लोकांना ओळखणं कठीण असते कारण तिथे सगळे अवतार असतात.