Farmers Protest : शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा! पोलिसांनी सोडले अश्रुधुराचे गोळे, सीमा सील; जाणून घ्या, 10 महत्त्वाच्या गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 04:19 PM2024-02-13T16:19:14+5:302024-02-13T16:30:04+5:30

Farmers Protest : शंभू सीमेवर शेतकरी आंदोलकांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांच्या 'चलो दिल्ली' मोर्चाबाबत हरयाणा आणि दिल्लीतील पोलीस हाय अलर्टवर आहेत. आज शेतकरी ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन दिल्लीकडे जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शंभू सीमेवर शेतकरी आंदोलकांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. दिल्ली ते हरयाणाचा रस्ता सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर हरयाणातून दिल्लीकडे येणारा रस्ताही काही वेळात सील करण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाबाबत आत्तापर्यंतच्या दहा गोष्टी जाणून घ्या...

१) दिल्लीत कलम 144 लागू आहे. सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शंभू सीमा पूर्णपणे छावण्यांमध्ये बदलल्या आहेत.

२) दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी लांबच लांब ट्रॅफिक जाम असून सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

३) दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांवर गेट बंद करण्यात आले आहेत.

४) एमएसपी (MSP) हमीभावासह अनेक मागण्यांवर शेतकरी पूर्णपणे ठाम आहेत. आम्ही नाही तर सरकारने रस्ता अडवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

५) आम्हाला संघर्ष नको, आम्ही शांततापूर्ण आंदोलनाच्या बाजूने आहोत. केंद्र सरकार आमच्या मागण्यांबाबत अजिबात गंभीर नाही, असे शेतकरी नेते सांगतात.

६) आम्ही शेतकरी धान्य पिकवतो आणि सरकार खिळे ठोकण्याचे काम करत आहे. आम्ही थंड लाठ्या आणि अगदी गोळ्यांचा सामना करण्यास तयार आहोत. सरकार फक्त दावा करते की त्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे, पण तसे अजिबात नाही, असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.

७) दुसरीकडे, शेतकऱ्यांचा विरोध पाहता दिल्ली सरकारने बवाना स्टेडियमचे जेलमध्ये रूपांतर करण्याचा केंद्राचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

८) दिल्ली-एनसीआर सीमेवर सुमारे 18 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांसह रॅपिड ॲक्शन फोर्स, सीआयएसएफ, बीएसएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

९) सुरक्षा दलाचे जवान ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवत आहेत. सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

MSP साठी कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.