थरारक! AC बसमध्ये भयंकर स्फोट; ५० फूट हवेत उडाला मॅकेनिक, शरीराच्या चिंधड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 11:54 AM2022-09-23T11:54:57+5:302022-09-23T11:57:43+5:30

उत्तर प्रदेशच्या बरेलीतील रामपूर येथे स्वालेनगर चार्जिंग स्टेशनवर ई-बसमध्ये गॅस भरत असताना एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन एका मेकॅनिकचा मृत्यू झाला, तर दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. डीएमने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या अपघातात मेकॅनिक विजय कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. तर टेक्निशियन नरेंद्र आणि सेवा अभियंता बबलू हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डीएम शिवकांत द्विवेदी, एसएसपी अखिलेश चौरसिया यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास सुरू केला आहे.

शहर दंडाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय पथक तयार करण्यात आलं आहे. अतिरिक्त संचालक (कारखाना), मुख्य अग्निशमन अधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तपासानंतर या घटनेसाठी जबाबदार असण्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे डीएम म्हणाले.

हा स्फोट इतका जोरदार आणि भयंकर होता की मेकॅनिकच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. घटनेनंतर किल्ला पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी मृत व्यक्तीचे अंग कापडाने झाकले. बसच्या एसीच्या कॉम्प्रेसरचा मोठा स्फोट झाल्याने ई-बस चार्जिंग स्टेशनमध्ये उपस्थित असलेले लोक हादरले.

स्फोटामुळे बसच्या छतावर काम करत असलेला मेकॅनिक विजय सुमारे जवळपास ५० फूट हवेत फेकला गेला आणि त्यानंतर जमिनीवर पडला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, चार्जिंग स्टेशनवर अन्य लोक असते तर त्यांच्याही जीविताची हानी झाली असती.

शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १५ इलेक्ट्रिक बस धावतात. त्यापैकी एका बसच्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड होता. त्यासाठी मेकॅनिक विजय कुमार गुरुवारी सकाळी ११.३० वाजता एसी बस दुरुस्तीचं काम करत होता. त्यांच्यासोबत तंत्रज्ञ नरेंद्र आणि सेवा अभियंता बबलू होते.

एसीचा कॉम्प्रेसर दुरुस्त केल्यानंतर विजय, नरेंद्र आणि बबलू बसच्या छतावर बसून गॅस भरत होते. त्यानंतर अचानक कॉम्प्रेसरचा स्फोट झाला आणि विजय हा हवेत फेकला गेला त्यानंतर तो जमिनीवर आपटला त्यात त्याचा मृत्यू झाला, तर विजयपासून थोड्या अंतरावर असलेले नरेंद्र आणि बबलू हे दोघेही बस खाली पडले.

प्रत्यक्षदर्शी कमल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते शहरातून फतेहगंज पश्चिमेला काही कामानिमित्त जात होते. चार्जिंग स्टेशन समोर पोचलो तेव्हा जोराचा आवाज ऐकू आला. त्याने त्या बाजूला पाहिले तर एक माणूस हवेत उडाल्याचा दिसलं त्यानंतर तो जमिनीवर आपटला. हा स्फोट इतका जोरदार होता की थोडे जवळ गेले असते तर कानाचे पडदे फुटले असते असं वाटत होते असं लोकांनी सांगितले

घटनास्थळी सेफ्टी हेल्मेटसह अनेक लोखंडी साहित्याचे तुकडे पडले होते. अपघाताची भीषणता सांगणारे रक्त आणि मृतांचे अवयव सर्वत्र पडले होते. घटनेनंतर किल्ला पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी मृत व्यक्तीचे अंग कापडाने झाकले. पोलिसांनी विजयचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

चार्जिंगदरम्यानच बसच्या एसीमधील बिघाड झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यानंतरच तंत्रज्ञ, सेवा अभियंता आणि मेकॅनिक यांना बोलावण्यात आले. तिघांनीही काम सुरू करण्यापूर्वी बसचे चार्जिंग बंद केले होते, मात्र कोणीतरी पुन्हा चार्जिंग उघडले, त्यामुळे हा अपघात झाला. मात्र, जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून याला दुजोरा मिळालेला नाही.

स्फोट होताच आजूबाजूच्या लोकांमध्ये खळबळ माजली. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याने मोठ्या संख्येने लोक चार्जिंग स्टेशनकडे धावले. जेव्हा जमाव चार्जिंग स्टेशनमध्ये घुसला तेव्हा गार्डने गेट बंद केले आणि आतील लोकांना बाहेर काढले. यानंतरही चार्जिंग स्टेशनच्या गेटवर बराच वेळ गर्दी कायम होती.