जंगल, नद्या, वाळवंट; खतरनाक वाट पार करून अमेरिकेत पोहोचले होते भारतीय, काय आहे डंकी रूट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:14 IST2025-02-06T09:50:01+5:302025-02-06T11:14:32+5:30
Donkey Route: बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याने अमेरिकेतून हकालपट्टी करण्यात आलेले १०४ भारतीय नागरिक मायदेशात दाखल झाले आहेत. हे भारतीय नागरिक भारतामधून कायदेशीररीत्या बाहेर गेले होते. मात्र त्यांनी डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर आता डंकी रूट म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याने अमेरिकेतून हकालपट्टी करण्यात आलेले १०४ भारतीय नागरिक मायदेशात दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलेल्या या भारतीयांना मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमेवरून पकडण्यात आलं होतं. हे भारतीय नागरिक भारतामधून कायदेशीररीत्या बाहेर गेले होते. मात्र त्यांनी डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेतून निर्वासित करण्यात आलेल्या या नागरिकांमध्ये हरयाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी ३३, पंजाबमधील ३० महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी ३ आणि चंडीगडमधील दोन जणांचा समावेश आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आता डंकी रूट म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला आहे. तुम्ही जर शाहरुख खानचा डंकी चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला डंकी रूट म्हणजे काय आणि या मार्गाने दुसऱ्या देशात जाण्यासाठी लोक कशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालतात, याची थोडीफार कल्पना येऊ शकते.
थोडक्यात सांगायचं तर डंकी रूट म्हणजे बेकायदेशीररीत्या परदेशात जाण्याचा मार्ग. यामध्ये लोक अनेक देशांमधून प्रवास करत बेकायदेशीररीत्या अमेरिका, कॅनडा किंवा युरोपीयन देशांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात.
यासाठी हे लोक पर्यटक व्हिसा किंवा एजंटच्या माध्यमातून दक्षिण अमेरिकेतील कुठल्याही एका देशात दाखल होतात. तिथून जंगल, नद्या आणि वाळवंट असा मार्ग पार करून अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेपर्यंत पोहोचतात. त्यानंतर दलालांच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये बेकायदेशीररीत्या घुसण्याचा प्रयत्न करतात.
डंकी शब्दाची निर्मिती ही पंजाबमधील डुंकी शब्दापासून झालेली आहे. त्याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारणं. डंकी रूट हा एक लांब पल्ल्याचा आणि खूप कठीण प्रवास असतो. डंकी रूटच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकदा काही महिनेही लागतात. या माध्यमातून प्रवास कराणे लोक, ट्रक, विमान, होडी किंवा पायी चालून जंगल, वाळवंट पार करत एका देशातून दुसऱ्या देशात जातात. यादरम्यान, प्रतिकूल हवामान, उपासमार, आजार, हिंसाचार या कारणांमुळे काही जणांचा मृत्यू देखील होतो.
डंकी रूटच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या लोकांना लपूनछपून प्रवास करावा लागतो. कारण या दरम्यान, ते कुणाच्या नजरेस पडले तर पकडले जाण्याची भीती असते. डंकी रूटच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या लोकांना मानव तस्करांना लाखो रुपये द्यावे लागताता. मानव तस्करसुद्धा आपलं संपूर्ण काम हे लपूनछपून आणि बेकायदेशीर रॅकेटच्या माध्यमातून करतात.
डंकी रूटच्या माध्यमातून जाणारे लोक एक दोन नाही तर अनेक देशांमधून प्रवास करत आपल्या इच्छित देशापर्यंत पोहोचतात. मात्र या प्रवासासाठी केवळ एका देशाचा व्हिसा काढला जातो. त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी डंकी रूटचा मार्ग वापरला जातो.
दरम्यान, अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलेल्या लोकांवर भारतात कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांनी भारतातील कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. ते कायदेशीररीत्या देशातून बाहेरे गेले होते. मात्र अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसल्याच्या आरोपाखाली त्यांना माघारी धाडण्यात आले होते. मात्र या लोकांकडे पासपोर्ट उपलब्ध नसल्याने आता बायोमेट्रिक पद्धतीने त्यांची ओळख पटवली जाणार आहे.