कारगिल युद्धाबाबत मुशर्रफांनी शरीफांनाच अंधारात ठेवलेले? रॉने जेव्हा ती टेप ऐकवली तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:56 PM2023-07-26T12:56:50+5:302023-07-26T13:03:26+5:30

मुशर्रफ तेव्हा बिजिंगला होते. तिथून ते परिस्थिती हाताळत होते. रॉने त्यांचे फोन कॉल इंटरसेप्ट केले आणि जगभरातील गुप्तचर यंत्रणांमध्ये खळबळ उडाली...

कारगिल युद्धादरम्यान भारताची गुप्तचर यंत्रणा रॉचा महत्वाची भूमिका होती. भारतीय लष्कर जिवाची बाजी लावून लढत असताना पाकिस्तानींचे मनसुबे काय आहेत, हे कळण्याचा मार्ग नव्हता. यावेळी रॉने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि त्यांच्या खास ले. जनरल मोहम्मद अजीज खान यांचे फोन संभाषण टॅप केले आणि जगभरात खळबळ उडाली होती. भारतावर हल्ला करण्याचे मनसुबे जगासमोर आले होते, एवढ्या मोठ्या व्यक्तींचे फोन टॅप झाल्याने जगभरातील गुप्तचर यंत्रणा हैराण झाल्या होत्या.

मुशर्रफ यांना असे वाटत होते की भारताला कारगिलसाठी जो कट रचला जातोय त्याची किंचितही खबर नव्हती. ही टेप तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना देखील ऐकविली गेली होती. यावर शरीफ शांतच झाले होते. मुशर्रफनी रेडिओवर बाल्टी आणि पश्तो भाषांमध्ये अनेक संदेश जारी केले होते. तेव्हा एलओसीवर पाकिस्तानने जेवढे सैन्य आणि दहशवादी गोळा केले होते, ते देखील याच भाषेत बोलत होते.

यामागे मुशर्रफ यांची एक चाल होती. भारतीय सैन्याला वाटावे की काही दहशतवाद्यांनी सीमेत घुसखोरी केली आहे. परंतू, ते दहशतवादी नव्हते तर दहशतवाद्यांच्या वेशातील पाकिस्तानी सैनिक होते, त्यांनी कारगिलमध्ये प्रवेश केला होता.

'रॉ' आणि 'मिलिटरी इंटेलिजन्स'ची दिशाभूल करण्यासाठी परवेझ मुशर्रफ यांनी कारगिलमधील एलओसीवर खोटे रेडिओ संदेश प्रसारित केले. या संदेशांद्वारे अशा परिस्थितीचे वर्णन केले जात होते, ज्यामुळे कारगिल परिसरात फक्त जिहादी सक्रिय असल्याचे भारतीय यंत्रणांना वाटावे. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांचा काहीही संबंध नाहीय हे सांगण्याचा प्रयत्न सुरु होता.

मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची ब्लू प्रिंट तयार केली होती. पाकिस्तान सरकार यापैकी अनेक गोष्टींबाबत अनभिज्ञ होते. पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या मंत्रिमंडळालाही या युद्धाची माहिती नव्हती. मुशर्रफ यांनी कारगिल युद्धावरून पाकिस्तानच्या तिन्ही लष्करांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक यांनी केला आहे.

मुशर्रफ यांच्या 'युद्धा'बद्दल पाकिस्तानी हवाई दल आणि नौदलाला फारशी माहिती नव्हती. भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर जनरल मुशर्रफ यांच्या फसविल्याचे पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना जाणवले. लष्कराच्या मदतीने कारगिल युद्ध जिंकता येईल, अशी मुशर्रफ यांची योजना होती. परंतू, ते साफ फसले होते. अति आत्मविश्वासामुळे त्यांनी नौदल आणि हवाईदलाला या युद्धाची कल्पनाच दिली नव्हती.

कारगिल युद्धात भारतीय लष्कराचे प्रमुख राहिलेल्या वेदप्रकाश मलिक यांनी त्यांच्या 'फ्रॉम सरप्राइज टू व्हिक्टरी' या पुस्तकात असे अनेक खुलासे केले आहेत. या लढ्यादरम्यान RAW ने पाकिस्तानमधील अनेक फोन कॉल्स इंटरसेप्ट केले. मुशर्रफ यांचा फोन कॉल रॉचे तत्कालीन सचिव अरविंद दवे यांच्या पथकाने टॅप केला तेव्हा खरे सत्य समोर आले.

दवे यांनी तो फोन मिलिटरी इंटेलिजन्स चीफला फोन टॅपिंगबाबत सांगण्यासाठी केला होता. चुकून तो कॉल मलिक यांना लागला. कारगिल युद्धाच्या वेळी नवाझ शरीफ यांना ती टेप ऐकवण्यासाठी दोन अधिकारी पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. ते मिशन पूर्णपणे गुप्त राहिले होते.

मुशर्रफ तेव्हा बिजिंगमध्ये होते. त्यांनी अजीज खानला भारताला झालेल्या नुकसानीबद्दल विचारले. अजीज खानने सांगितले की भारताच्या एका एमआय १७ हेलिकॉप्टरला त्यांच्याच क्षेत्रात पाडले आहे व पाकिस्तानने ही कृती दहशतवाद्यांची असल्याचे सांगितले आहे. यावर शरीफ काय विचार करत आहे, असे मुशर्रफ यांनी विचारले तेव्हा अजीजने त्यांना ती माहिती देखील दिली.

सुरुवातीला भारताचे एक हेलिकॉप्टर आणि दोन लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली. यामुळे मुशर्रफ हे उत्साहात होते. हवाई दल आता काय रणनिती तयार करत असेल असे त्यांनी अजीजला विचारले तेव्हा त्याने भारताची विमाने योग्यरित्या उड्डाण करू शकत नाहीएत. त्यांचे नेम चुकत आहेत. यामुळे लढाऊ विमानांच्या फेऱ्या आता कमी होऊ लागल्या आहेत, असे सांगितले.

या चर्चेवर मुशर्रफ सातव्या आसमानमध्ये होते. परंतू, थोड्याच दिवसांत भारतीय हवाई दलाने मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक करून पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. खालच्या बाजुने लष्कर आणि वरून हवाई दल यांच्या कात्रीत सापडलेले पाकिस्तानी सैनिक जिवाच्या आकांताने शस्त्रास्त्रे तिथेच सोडून सैरावैरा पळत होते.