निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:42 IST2025-08-05T17:37:28+5:302025-08-05T17:42:47+5:30
नैसर्गिक आपत्तीमुळे गावाचं प्रचंड नुकसान झालं आहे, ज्यामध्ये अनेक घरं, दुकानं, लॉज, बाजारपेठा आणि हॉटेल्स वाहून गेली आहेत.

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावाचं प्रचंड नुकसान झालं आहे, ज्यामध्ये अनेक घरं, दुकानं, लॉज, बाजारपेठा आणि हॉटेल्स वाहून गेली आहेत. (Videograb: ITG)
या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. धराली गावाजवळील भागीरथी नदीच्या परिसरात ही घटना घडली, जिथे अचानक पूर आला आणि ढगफुटीमुळे सर्वच उद्धवस्त झालं. (Videograb: ITG)
पुरामुळे अनेक इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असतील, तर २०-२५ हॉटेल्स आणि होमस्टे वाहून गेले आहेत. (Videograb: ITG)
दुर्घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचं पथकं घटनास्थळी पोहोचलं. बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे, परंतु मुसळधार पाऊस आणि रस्ते बंद असल्याने मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. (Videograb: ITG)
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनेवर दुःख व्यक्त केलं आणि म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या तुकड्या युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्यात गुंतल्या आहेत. (Videograb: ITG)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री धामी यांच्याशी बोलून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. हवामान खात्याने १० ऑगस्टपर्यंत उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला. (Videograb: ITG)
विशेषतः डोंगराळ भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा धोका आहे. लोकांना नद्या आणि ओढ्यांपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. गंगोत्री धामच्या मार्गावर असलेले धराली गाव एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. (Videograb: ITG)
प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं आहे. बचाव पथकं बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. (Videograb: ITG)
"आज दुपारी १.३० वाजता पूर आला, ज्यामुळे धरालीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ६० ते ७० लोक बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. हे असं दृश्य कधीच पाहिलं नाही" अशी माहिती स्थानिकांनी दिलेली आहे.