Bullet Train: आता बुलेट ट्रेनने अयोध्येला जाता येणार; दिल्ली-वाराणसी मार्गावर १२ स्थानके निश्चित!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 09:00 AM2021-08-10T09:00:30+5:302021-08-10T09:05:05+5:30

आता दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला Bullet Train नेण्याची योजना आखली जात आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून देशात बुलेट ट्रेनची चर्चा जोरात सुरू असली, तरी प्रत्यक्षात ते स्वप्न साकार होण्यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत अनिश्चितता आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी अद्यापही भूमिअधिग्रहण पूर्ण झालेले नाही.

अशातच देशातील विविध ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला बुलेट ट्रेन नेण्याची योजना आखली जात आहे.

दिल्ली ते वाराणसी या मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, सप्टेंबरपर्यंत विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.

देशभरात बुलेट ट्रेनचे प्रकल्प राबवत असलेल्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. दिल्लीतील सराय काले खां येथून बुलेट ट्रेन सुरू होणार असून, पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीपर्यंतच्या ८६५ किमी मार्गावर ही बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.

आता भाविक अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथाचे दर्शन बुलेट ट्रेनने जाऊन करू शकतात, असे म्हटले जात आहे. दिल्ली ते वाराणसी या मार्गावर १२ स्थानके निश्चित करण्यात येणार आहेत.

दिल्लीहून सुरू होणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी नोएडा, मथुरा, आग्रा, इटावा, कन्नौज, लखनऊ, अयोध्या, रायबरेली, प्रयागराज, भदोही आणि वाराणसी अशी स्थानके नियोजित करण्यात आली आहेत. यामधील काही मार्ग एलिव्हेडेट असेल, असे सांगितले जात आहे.

दिल्ली ते वाराणसीचे अंतर ४ तासांत कापले जाऊ शकेल, असे म्हटले जात आहे. दिल्ली ते अयोध्या आणि पुढे वाराणसीला जाणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरू शकणार आहे. यमुना एक्स्प्रेस वेवरील प्रस्तावित जेवर एअरपोर्टशी ही बुलेट ट्रेन कनेक्ट करण्याचा मानस आहे.

दरम्यान, वाराणसी-हावडा (सुमारे ७६० किमी), मुंबई-नागपूर (सुमारे ७५३ किमी), दिल्ली-अहमदाबाद (सुमारे ८६६ किमी), चेन्नई-म्हैसूर (सुमारे ४५९), दिल्ली-अमृतसर (सुमारे ४५९), मुंबई-हैदराबाद (सुमारे ७११ किमी) या मार्गांवरही बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे.

या मार्गांचा विस्तृत प्रकल्प अहवाल डिसेंबर २०२३ पर्यंत नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड रेल्वे मंत्रालयाला सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिल्ली ते वाराणसी या मार्गादरम्यानचा अंतरिम विस्तृत प्रकल्प अहवाल गतवर्षीच्या २९ ऑक्टोबर सादर केला होता. प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम जानेवारी २०२१ रोजी सुरू झाल्याचे समजते.