शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 6:31 PM

1 / 10
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के ( Cyclone Tauktae ) हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
2 / 10
कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
3 / 10
अरबी समुद्रात तयार झालेल्या तौत्के चक्रीवादळाने आता मोठ्या प्रमाणात वेग पकडल्याची माहिती हवामान खात्यानं सांगितली आहे. तसेच हे चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे.
4 / 10
जागतिक हवामान संस्था ( World Meteorological Organisation)/ युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक ( United Nations Economic ) आणि सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिक ( Social Commission for Asia and the Pacific (WMO/ESCAP) Panel on Tropical Cyclones) हे चक्रीवादळाला नाव देतात.
5 / 10
या पॅनलमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या १३ देशांचा समावेश आहे. त्यामुळे या विभागात येणाऱ्या चक्रीवादळाला ही देशं आलटूनपाटून नावं देतात.
6 / 10
२००४मध्ये आठ देशांनी एकत्र येऊन हे पॅनल सुरू केलं. त्या देशांनी प्रत्येकी ८ अशी एकूण ६४ नावांची यादी तयार केली. अम्फान हे गेल्यावर्षी आलेल्या वादळाचं नाव त्या यादीतील एक होतं. गतवर्षी आणखी एक वादळ आलं होतं आणि बांगलादेशनं त्याचं नाव निसर्ग असे ठेवले होते.
7 / 10
या यादीमध्ये नव्यानं समाविष्ठ करण्यात आलेले ते पहिलेच नाव होते. २०१८मध्ये या पॅलमध्ये आणखी पाच देशांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर १६९ नावांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली. १३ देशांनी प्रत्येकी १३ नावं सुचवली.
8 / 10
वादळांना नाव दिल्यानं वैज्ञानिक, तज्ज्ञ, आप्तकालिन व्यवस्थापकीय टीम आणि सामान्य लोकांना प्रत्येक वादळाची माहिती मिळण्यास मदत मिळते. त्याशिवाय एकाच वेळी दोन किंवा तीन वादळ येऊन धडकली तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत नाही. ते ओळखणं सोपं जावं, लोकांना त्याची माहिती सोप्या पद्धतीने कळावी यासाठी अशी नावं देण्यास सुरुवात झाली.
9 / 10
सुरुवातीला गावं, बोटी किंवा इतर गोष्टींवरून ही नावं दिली जात होती. मधल्या काही काळात महिलांची नावंही वादळांना दिली गेली, परंतु त्यावरून महिला संघटनांनी आक्षेप घेतला आणि १९७९ मध्ये पुरुषांची नावंही वादळाला दिली जाऊ लागली. १९५३ पासून अटलांटिक समुद्रात येणाऱ्या वादळांना नॅशनल हुरिकेन सेंटरने दिलेल्या यादीनुसार नावं दिली जातात. आता जागतिक हवामान संघटनेकडून ही यादी सातत्याने अद्ययावत केली जाते.
10 / 10
म्यानमारनं या चक्रीवादळाला 'तौत्के' हे नाव दिले आहे. त्याचा अर्थ गीको ''Gecko' असा होता. गीको हा बर्मीस येथे आढळणारा सरडा आहे. या सरड्याच्या नावावरून वादळाला नाव देण्यात आले आहे.
टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळcycloneचक्रीवादळ