CoronaVirus News: गंभीर इशारा! पारा घसरणार तसा कोरोना धुमाकूळ घालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 08:18 PM2020-07-19T20:18:28+5:302020-07-19T20:24:10+5:30

गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ३५ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे.

एका बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढल्यानं चिंतेत भर पडली आहे. त्यातच आता आयआयटी भुवनेश्वर आणि एम्सच्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानं काळजी आणखी वाढली आहे.

देशात आता पाऊस जोर धरू लागला आहे. पावसाचा जोर जसाजसा वाढेल, तसतसा कोरोनाचा प्रादुर्भावदेखील वाढेल, असा धोक्याचा इशारा अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. हिवाळ्यातही कोरोनाचा फैलाव वेगानं होईल, असंदेखील अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

पाऊस, तापमानातील घट आणि हिवाळा यामुळे वातावरण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास अनुकूल होत जाईल, असा आयआयटी भुवनेश्वर आणि एम्सच्या संशोधकांचा अभ्यास सांगतो.

आयआयटी भुवनेश्वरमधील स्कूल ऑफ अर्थ, ओशन अँड क्लायमेट सायन्सेस विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व्ही. विनोज यांच्या अध्यक्षतेखाली संशोधकांनी कोरोना आणि तापमानाच्या संबंधांचा अभ्यास केला. भारतातील संक्रमण आणि तापमान आणि आर्द्रतेवरील अवलंबित्व या शीर्षकाखाली अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

एप्रिल ते जून कालावधीतील देशाच्या २८ राज्यांमधला कोरोनाचा वाढता कहर आणि तेथील तापमान यांचा अभ्यास करून संशोधकांनी अहवाल तयार केला आहे.

तापमान वाढल्यास कोरोना संक्रमणाचा वेग कमी होतो, असं अभ्यासातून समोर आल्याचं आयआयटी भुवनेश्वरच्या स्कूल ऑफ अर्थ, ओशन अँड क्लायमेट सायन्सेस विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व्ही. विनोज यांनी सांगितलं.

हवेतील आर्द्रता वाढल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होईल, असा धोक्याचा इशारा संशोधकांकडून देण्यात आला आहे.

आर्द्रता वाढल्यानंतर वातावरण कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी अतिशय पोषक होतं. त्यामुळे संक्रमणाचा वेग वाढतो, अशी माहिती संशोधक करणाऱ्या पथकातील सदस्य आणि एम्स भुवनेश्वरच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या डॉ. बिजयिनी बेहरा यांनी दिली.

कोरोना संक्रमणाचा वेग सूर्य किरणांवर अवलंबून असतो. हिवाळा आणि उन्हाळ्यातील तापमानात साधारणत: सात अंश सेल्सिअसचा फरक असतो. हाच फरक कोरोना संक्रमणाचा वेग वाढवण्यास कारणीभूत ठरू शकेल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

Read in English