CoronaVirus News : "प्लाझ्मा ही जादूची गोळी नाही तर 'हा' आहे कोरोनावर योग्य उपाय", तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 01:01 PM2020-10-23T13:01:13+5:302020-10-23T13:12:25+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेलं नाही असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. आयसीएमआरने केलेल्या सूक्ष्म निरिक्षणानंतर डॉ. गुलेरिया यांनी माहिती दिली.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. रुग्णांचा आकडा आता तब्बल 77,61,312 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 1,17,306 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,366 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 690 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.

काही रिपोर्ट्समध्ये येत्या सणसुदीच्या काळात आणि थंडीच्या दिवसांत कोरोनाचा धोका वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेत भर पडत आहे.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी प्लाझ्मा थेरपीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेलं नाही असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. आयसीएमआरने केलेल्या सूक्ष्म निरिक्षणानंतर डॉ. गुलेरिया यांनी माहिती दिली.

"एखाद्या रुग्णाच्या शरीरात आधीपासूनच अँटीबॉडीज असतील तर त्याला बाहेरून त्या दिल्यास त्याचा फार फायदा होणार नाही. प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही."

"प्लाझ्मा ही जादूची गोळी नाही. आपल्याला या पद्धतीचा योग्य उपयोग करायला हवा. प्लाझ्मा थेरपीचा प्रत्येकाला फायदा होईल असं नाही. आपल्याला ते उपयुक्त ठरेल तिथेच त्याचा योग्य प्रकारे उपयोग करावा लागेल"

"कोरोनावर योग्य वेळी उपचार मिळाल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, हेच कोरोनातून आपण शिकलोय" असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच वेळीच उपचार करण्याचा मोलाचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हिवाळ्यामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ दिसून येते. कोरोनाच्या बाबतीतही असंच काहीसं घडण्याची शक्यता आहे. असा डेटा ही समोर आला आहे.

हवेच्या प्रदूषणातून संसर्ग खूप वेगाने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. हे इटली आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या अभ्यासावर आधारित आहे असं देखील डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी भारतात कोरोना समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला असल्याचं रविवारी मान्य केलं आहे. मात्र हा समूह संसर्ग केवळ काही जिल्हे आणि राज्यांपुरता मर्यादित असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विधानानंतर त्यांनी ही माहिती दिली. याआधी ममता बॅनर्जी यांनी राज्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचं म्हटलं होतं.

हर्षवर्धन यांनी "संडे संवाद" या त्यांच्या सोशल मीडियातील कार्यक्रमात याबाबत माहिती दिली आहे. इतर राज्यांमध्ये देखील समूह संसर्ग सुरू आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन यांना केला गेला.

"पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागात समूह संसर्ग प्रसार होण्याची शक्यता आहे. खास करून दाट लोकवस्तीत हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पण समूह संसर्ग हा संपूर्ण देशभरात नाही आहे. हा फक्त मर्यादित राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्येच आहे" अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.