भीषण, भयंकर, भयावह! जगभरातील कोरोना बळींची संख्या 40 लाखांवर; 166 दिवसांत 20 लाख मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 04:16 PM2021-06-18T16:16:05+5:302021-06-18T16:29:11+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 166 दिवसांत तब्बल 20 लाख मृत्यू झाले आहेत.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही ठिकाणी पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 17 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 178,253,971 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जगभरातील कोरोना बळींची संख्या 40 लाखांवर पोहोचली आहे.

कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 166 दिवसांत तब्बल 20 लाख मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्याचं भीषण चित्र आहे.

जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र तरी देखील मृतांचा आकड्याने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसचं नवनवीन रुप समोर येत असल्याने धोका आणखी वाढला आहे.

'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील मृतांचा आकडा 40 लाखांच्या पुढे गेला आहे. 166 दिवसांत तब्बल 20 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया आणि मेक्सिकोचा समावेश आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू याच देशांमध्ये झाले आहेत.

लोकसंख्येनुसार मृत्यू दर पाहिल्यास यामध्ये पेरू, हंगेरी, बोस्निया सारख्या देशांची नावे आघाडीवर आहेत. जून महिन्यात सर्वाधिक बाधित असलेल्या 10 देशांपैकी 9 देश दक्षिण अमेरिकेतील आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्दी, खोकला झाला तरी कोरोनाची लक्षणं तर नाहीत ना? अशी शंका अनेकांच्या मनात डोकावत असते. मात्र आता एक असा अलार्म तयार करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आजुबाजूला असणाऱ्या रुग्णांची माहिती मिळणार आहे.

तुमच्या आजूबाजूला एखादा कोरोना रुग्ण असेल तर तुम्हाला तो धोक्याची घंटा देणार आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी सीलिंक माउंटेड कोविड अलार्म तयार केला आहे. जो रुममधील कोरोनाबाधित व्यक्तीबद्दल 15 मिनिटांत माहिती देईल, असा दावा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे.

द संडे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कोरोनाग्रस्तांबद्दल माहिती देणारं हे उपकरण येत्या काळात विमानातील केबिन, शाळा , केअर सेंटर आणि घर तसंच कार्यालयांमध्ये स्क्रिनिंगसाठी बसवता येईल. या उपकरणाचा आकार स्मोक अलार्मपेक्षा थोडा मोठा असणार आहे.

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहॅम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर केलेल्या संशोधनाचे प्राथमिक निकाल आशादायी आहेत. डिव्हाईसमधील परिणामाची अचूकता पातळी 98-100 टक्के पर्यंत प्रभावी आहे, असं संशोधकांनी टेस्टिंगनंतर सांगितलं.

केंब्रिजशायरमधील फर्म रोबो साइंटिफिकने तयार केलेला हा सेन्सर त्वचेद्वारे निर्मित रसायनं शोधून कोरोनाबाधित व्यक्ती ओळखू शकतो. हा सेन्सर कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांच्या श्वासामध्ये असलेल्या रसायनांचं परीक्षण करून निकाल देतो म्हणजेच ती व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही, हे सांगतो.

सेन्सर मानवी नाकाद्वारे ओळखता येणाऱ्या सूक्ष्म वासालाही ओळखतो. कोविड अलार्म शोधणाऱ्या या टीमच्या एका संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, हा सूक्ष्म वास केवळ श्वान ओळखू शकतात मात्र, हा अलार्म त्यापेक्षा जास्त अचूक माहिती देऊ शकेल.