coronavirus: भारतातील कोरोना संकट अमेरिका, ब्राझीलपेक्षा गंभीर, ऑगस्टमधील आकडेवारीने वाढवली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:35 PM2020-08-10T12:35:39+5:302020-08-10T13:02:36+5:30

जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा ओलांडला आहे. तसेच अमेरिका ब्राझील आणि भारतामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे.

भारतातील कोरोना संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. नव्या आकडेवारीनुसार आता भारतामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. तसेच दररोज सापडणाऱ्या रुग्णस संख्येच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे.

जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा ओलांडला आहे. तसेच अमेरिका ब्राझील आणि भारतामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून भारतातील कोरोनाची स्थिती अधिकच गंभीर झाली असून, ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी चिंता वाढवत आहे.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये ब्राझीलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी होते. मात्र नंतर हे प्रमाण वाढत गेले. ब्राझीलमध्ये १२ मार्च रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. तर शनिवारी येथील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. भारतातही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ४४ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशात एक हजारांहून अधिका मृत्यूंची नोंद झाली आहे.

रविवारपर्यंत जगभरात कोरोनामुळे एकूण ७ लाख ३१ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भारतामध्ये रविवारपर्यंत २२ लाख १२ हजार ७३७ रुग्ण सापडले असून, ४४ हजार ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारातातील कोरोनाचा मृत्यूदर हा २.०१ टक्के आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून भारतातील परिस्थिती अधिकच बिघडली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाची आकडेवारी ठेवणाऱ्या वल्डोमीटरच्या अहवालानुसार भारतात १ ते ८ ऑगस्टदरम्यान कोरोनाचे एकूण ३ लाख ९९ हजार २६३ रुग्ण सापडले आहेत. तर याच ७ दिवसांत अमेरिकेमध्ये ३ लाख ८४ हजार ०८९ रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्येच्या बाबततीत भारत अमेरिकेच्या पुढे गेला आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे भारत आणि अमेरिकेमधील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येमधील अंतरही कमी होण्याची शक्यता आहे.

रविवारी अमेरिकेतील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा पार केला आहे. भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा हा आकडा दुप्पट आहे. तर ३० लाख रुग्णांसह ब्राझील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

१ ते ८ ऑगस्टदरम्यान ब्राझीलमध्ये कोरोनाच्या ३ लाख ०४ हजार ४९३ नव्या रुग्णांची नोंद झाली. भारत आणि अमेरिकेपाठोपाठ ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक आकडेवारी आहे.

तत्पूर्वीच्या एका आढवड्यात अमेरिकेमध्ये कोरोनाचे ४ लाख ४७ हजार ०२६ रुग्ण सापडले होते. तर भारतात ३ लाख ६६ हजार १९६ आणि ब्राझीलमध्ये ३ लाख १२ हजार ४४२ रुग्ण सापडले होते. गेल्या दीड महिन्यामध्ये प्रथमच कुठल्याही देशाने कोरोनाबाधितांच्या संख्येत अमेरिकेला मागे टाकले आहे.

यापूर्वी २५ जून रोजी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते. भारतासासाठी चिंतेची बाब म्हणजे जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत आघाडीवर असलेल्या देशांपैकी भारतामध्येच सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. इतर देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत किंचित घट झाली आहे.