Corona Virus : कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:19 IST2025-05-27T11:07:40+5:302025-05-27T11:19:15+5:30

Corona Virus : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. गेल्या एका आठवड्यात भारतात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले आहेत.

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. गेल्या एका आठवड्यात भारतात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,००० च्या पुढे गेली आहे. केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत. यासोबतच परदेशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या प्रमुख विमानतळांवर येणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये NB.1.8.1 हा एक नवीन कोरोना व्हेरिएंट आढळून आला आहे. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, कोरोना व्हेरिएंटमुळे चीन आणि आशियातील काही भागात रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं मानलं जातं.

अमेरिकेतील विमानतळांवर नवीन कोरोना व्हेरिएंट NB.1.8.1 आढळला. CDC ची एअरपोर्ट टेस्टिंग पार्टनर जिन्कगो बायोवर्क्सच्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, व्हर्जिनिया आणि न्यूयॉर्क क्षेत्रातील विमानतळांवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये NB.1.8.1 व्हेरिएंट आढळून आला आहे.

हाँगकाँग आणि तैवानमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचं आणि आपत्कालीन कक्षात येणाऱ्या रुग्णाचं प्रमाण वाढल्याचं नोंदवलं आहे, ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती, लस आणि अँटीव्हायरल औषधांचा साठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मे २०२५ पर्यंत, NB.1.8.1 नावाचा एक नवीन कोरोना व्हेरिएंट, जो ओमायक्रॉन सबलायनेज JN.1 मधून येतो. आशियामध्ये कोरोना प्रकरणांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या वाढीला कारणीभूत ठरणारा घटक म्हणून हा ओळखला गेला आहे आणि अमेरिकेतही तो आढळून आला आहे.

हा व्हेरिएंट सर्वप्रथम चीनमध्ये आढळून आला, जो लवकरच एक मोठा स्ट्रेन बनला. सिंगापूर आणि हाँगकाँगसह आशियातील इतर भागातही तो असल्याचं समोर आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) NB.1.8.1 ला SARS-CoV-2 व्हेरिएंटच्या वाढत्या जागतिक प्रसारामुळे व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंग म्हणून घोषित केलं आहे. ज्याचा पहिला नमुना २२ जानेवारी २०२५ रोजी गोळा करण्यात आला होता. २३ मे २०२५ रोजी त्याचे अधिकृतपणे VUM म्हणून वर्गीकरण करण्यात आले.

सीडीसीच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्याभरात दर आठवड्याला सरासरी ३५० अमेरिकन लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. एजन्सीने म्हटलं आहे की मृतांची संख्या खूप जास्त असली तरी, संसर्गाची संख्या कमी होत आहे.