कोरोनावरील लस सध्या बाजारात विकली जाणार नाही - नीती आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 03:40 PM2021-01-14T15:40:47+5:302021-01-14T16:33:49+5:30

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरणला १६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लसी दिली जाणार आहे.

लसीकरण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नीती आयोगाने बुधवारी हे स्पष्ट केले की, आपत्कालीन वापरासाठी मंजूर झालेल्या लसींना बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

सरकारने परवानगी दिल्यावरच सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक लसींना बाजारात विक्री करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अलीकडे सरकारने सीरम इंस्टिट्युटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींना आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून देशात सुरू होणार आहे.

यावेळी फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. त्यानंतर ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईल. तसेच, पोलीस आणि सैनिकांनाही लस देण्यात येणार आहे.

भारत बायोटेक आपली लस केंद्र सरकारला २९५ रुपयांना विकत आहे. केंद्र सरकारकडून ५५ लाख लसींची ऑर्डर देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, भारत बायोटेक केंद्र सरकारकडून फक्त ३८.५ लाख लसींचा खर्च घेत आहे. सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला सुद्धआ १.१ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. कोविशिल्ड लसची किंमत प्रति डोस २०० रुपये आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, एकदा सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ते आपल्या कंपनीची लस कोविशील्ड बाजारात एक हजार रुपयांना विकतील.

लसीकरण मोहिमेतील सर्वात मोठी भूमिका म्हणजे कोविन अ‍ॅप, जे संपूर्ण लसीकरण मोहिमेचा कणा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोविन अॅप तयार करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. हे संपूर्ण मॅनेजमेंट सिस्टम अॅप आणि पोर्टलद्वारे आहे.

ही लस केवळ संमतीने दिली जाईल. ज्या व्यक्तीने लस घेण्यास नकार दिला, त्या व्यक्तीची माहिती लिस्टमधून काढून टाकली जाईल. जर एखाद्या व्यक्तीचे नाव लस घेण्याच्या लिस्टमध्ये असेल, त्याला मेसेज पोहोचला असेल आणि तो लसीकरणाच्या ठिकाणी पोहोचला नाही तर त्या व्यक्तीचे नाव पुढील लसीकरणाच्यावेळी सामील केले जाईल.

म्हणजेच हे अगदी स्पष्ट आहे की, ज्या दिवशी तुम्हाला लसीकरणाची वेळ देण्यात आली आहे, जर तुम्ही त्या दिवशी पोहोचला नाही तर तुम्हाला पुढील लसीकरणावेळी डोस दिला जाईल.