Rafale Fighter Jet: राफेलच्या कमांडिंग ऑफिसरची अचानक बदली; हवाई दलात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 10:07 AM2021-03-12T10:07:32+5:302021-03-12T10:16:32+5:30

Rafale Group Captain harkirat singh Ambala: बऱ्याच वादंगानंतर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात फ्रान्सची राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंग यांच्या जागी कॅप्टन रोहित कटारिया येणार आहेत.

बऱ्याच वादंगानंतर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात फ्रान्सची राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. मात्र, काही महिन्यांतच राफेलच्या पहिल्या स्क्वाड्रनचे कमांडिग अधिकारी ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंग यांची अचानक बदली करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हरकीरत सिंग यांची बदली शिलाँगच्या पूर्व एअर कमांडच्या मुख्यालयात करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी अंबाला एअरबेसवर कॅप्टन रोहित कटारिया राफेल विमानांची 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनची (17 Golden Arrow Squadron) जबाबदारी सांभाळणार आहेत.

सुत्रांनी एनबीटीला सांगितल्यानुसार ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंग हे राफेलच्या दुसऱ्या स्क्वाड्रनची तैनाती आणि तेथील कामकाज सांभाळण्याची शक्यता आहे.

हवाई दलाच्या या पावलावरून अधिकाऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय असामान्य आहे. कोणत्याही नवीन स्क्वॉड्रनच्या सीओची सहा-सात महिन्यात अचानक बदली करणे संशयी आहे.

खासकरून ही बदली राफेलसारख्या स्क्वाड्रनशी संबंधीत अधिकाऱ्याची असेल. आतापर्यंत स्क्वाड्रनमध्ये 18 पैकी 11 लढाऊ विमानेच दाखल झाली आहेत.

भारतीय हवाईदलाने एप्रिलच्या मध्यावर राफेल लढाऊ विमानांच्या दुसऱ्या स्क्वाड्रनच्या तैनातीची तयारी केली आहे. ही स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हाशिमारा हवाई तळावर तैनात केली जाणार आहे. राफेलची पहिली स्क्वाड्रन हिमाचलच्या अंबाला हवाई तळावर तैनात आहे.

पहिले राफेल विमान 29 जुलैला भारतात दाखल झाले होते. फ्रान्सने 59 हजार कोटी रुपयांना भारताला 36 लढाऊ विमाने देण्याबाबत 2015 मध्ये करार केला होता. गेल्या वर्षी 10 सप्टेंबरला पहिले राफेल अंबालामध्ये हवाई दलात दाखल झाले होते.

दुसऱ्या राफेल विमानांचा जथ्था तीन नोव्हेंबरला भारतात आला होता. तर आणखी तीन विमाने ही 27 जानेवारीला भारतात आली होती. पुढील काही महिन्यांत आणखी राफेल विमाने भारताला मिळणार आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये 18 विमाने असतात.

भारतीय हवाई दलाच्या गोल्डन ॲरोज तुकडीत (स्क्वॉड्रन) १६ ओम्नी रोल राफेल जेट लढाऊ विमाने येत्या एप्रिलमध्ये दाखल झाल्यावर दलाच्या मारक क्षमतेला बळ मिळेल.

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्ये सात राफेल लढावू विमाने सध्या वापरली जात आहेत.

याशिवाय फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन निर्माती सॅफ्रॅन लढाऊ विमानांची इंजिने आणि दुय्यम भाग भारतात बनवण्यास तयार आहे, असे या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.