अभिमानास्पद! कोरोना व्हॅक्सीन बनवणाऱ्या ऑक्सफर्डच्या टीममध्ये भारताची कन्या, बजावतेय महत्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:49 PM2020-06-02T17:49:25+5:302020-06-02T18:40:20+5:30

ज्या व्हॅक्सीनकडे लागले आहे संपूर्ण जगाचे लक्ष, ती व्हॅक्सीन तयार करण्यात भारताची 'ही' कन्या बजावतेय महत्वाची भूमिका

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. तर लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या जगभरातील 100हून अधिक देश कोरोना व्हॅक्सीन तयार करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. मात्र, अद्याप कुणालाही कोरोना व्हॅक्सीन तयार करण्यात यश आलेले नाही.

कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनवर संशोधन करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक टीम तयार केली आहे. यात भारतीय वंशाच्या वैज्ञानिक कन्येचाही समावेश आहे. चंद्रबली दत्ता, असे या वैज्ञानिक कन्येचे नाव आहे. दत्ता या मुळच्या कोलकाता येथील आहेत.

चंद्रबली दत्ता म्हणाल्या, संपूर्ण जग आमच्याकडे आशेने पाहत आहे आणि मानवतेच्या सेवेसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ज्ञाची जी टीम तयार करण्यात आली आहे. त्यात स्थान मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजते.

मुळच्या कोलकाता येथील चंद्रबली दत्ता, या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इंस्टिट्यूटमध्ये क्लिनिकल बायोमेनक्योरिंग फॅसिलिटीमध्ये नोकरी करतात. येथेच कोरोनावरील ChAdOx1 नावाच्या व्हॅक्सीनचे मानवावरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे परीक्षण सुरू आहे.

ही व्हॅक्सीन यशस्वी ठरली, तर कोरोना व्हायरसशी लढण्यात जगाला मोठे यश मिळेल. ट्रायल यशस्वी झाल्यास हीच कोरोनावरील संभाव्य व्हॅक्सीनदेखील ठरू शकते.

चंद्रबली दत्ता म्हणाल्या, क्वालिटी अशोरंन्स मॅनेजर म्हणून काम करणे म्हणजे, परीक्षणाच्या टप्प्यांमध्ये प्रगती होण्यापूर्वी सर्व स्थरांवरील मानकांचे योग्य प्रकारे पालन व्हावे, हे निश्चित करणे. तसेच ''आम्ही सर्व आशावादी आहोत, की ही व्हॅक्सीन पुढील टप्प्यातही योग्य प्रकारे काम करेल, संपूर्ण जगाचे या व्हॅक्सीनकडे लक्ष आहे,'' असेही त्या म्हणाल्या.

चंद्रबली दत्ता यांनी सांगितले, 'या योजनेचा भाग होणे आनंदाची गोष्ट आहे. ही एक नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. येथील वैज्ञानिक व्हॅक्सीन यशस्वी बनवण्यासाठी रोज तासंतास परिश्रम करत आहे. जेने करून मानवाचे रक्षण व्हावे. हा टीमचा मोठा प्रयत्न आहे आणि सर्वांनीच या व्हॅक्सीनसाठी दिवस-रात्र काम केले आहे. मी या योजनाचा भाग झाल्याने स्वतःला भाग्यशाली समजते.