अवघ्या १२ मतांनी लागला निकाल, बिहारमधील या मतदारसंघांमध्ये झाली कांटे की टक्कर

By बाळकृष्ण परब | Published: November 11, 2020 12:58 PM2020-11-11T12:58:53+5:302020-11-11T13:48:37+5:30

Bihar Assembly Election Result : कोरोनाकाळामुळे मतांची मोजणी ही संथगतीने होत होती. त्यात काही ठिकाणी मतांचे अंतर कमी असल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव होता. सात मतदारसंघांमध्ये तर विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये ५०० हून अधिक मतांचा फरक होता.

अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. मात्र बहुमताचा पल्ला गाठेपर्यंत एनडीएची चांगलीच दमछाक झाली होती. काही ठिकाणी तर अगदी किरकोळ मतांनी निकाल लागले. अशाच निकालंचा घेतलेला हा आढावा...

कोरोनाकाळामुळे मतांची मोजणी ही संथगतीने होत होती. त्यात काही ठिकाणी मतांचे अंतर कमी असल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव होता. सात मतदारसंघांमध्ये तर विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये ५०० हून अधिक मतांचा फरक होता. एका मतदार संघात तर विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये केवळ १२ मतांचे अंतर राहिले होते.

बिहारमधील हिलसा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. येथे जेडीयूच्या कृष्णमुरारी शरण यांना ६१ हजार ८४८ मते मिळाली तर आरजेडीच्या शक्तीसिंह यादव यांना एकूण ६१ हजार ८३६ मते मिळाली. याठिकाणी लोकजनशक्ती पार्टीचे उमेदवार सुमन सिंह यांनी १७ हजार ४७१ मते मिळवली.

अन्य अटीतटीच्या लढतींमध्ये बारबिघा मतदारसंघात जेडीयूच्या सुदर्शन कुमार यांनी काँग्रेसच्या गजानंद श्याही यांना ११३ मतांनी पराभूत केले.

रामगड मतदारसंघात आरजेडीच्या सुधाकर सिंह यांनी बसपाच्या अंबिका सिंह यांना १८९ मतांनी पराभूत केले.

मतिहानी मतदारसंघात लोकजनशक्ती पार्टीच्या राजकुमार सिंह यांनी जनता दल युनायटेडच्या नरेंद्र कुमार सिंह यांना ३३३ मतांनी पराभूत केले.

भोरे मतदारसंघात जनता दल युनायटेडच्या सुनील कुमार यांनी सीपीआय एमएलचे जितेंद्र पासवान यांना ४६२ मतांनी पराभूत केले.

देहरी मतदारसंघात राजदच्या फते बहादूर सिंह यांनी भाजपाच्या सत्यनारायण सिंह यांना ४६४ मतांनी पराभूत केले.

बचवारा मतदारसंघात भजापाच्या सुरेंद्र मेहता यांनी सीपीआयच्या अबदेश कुमार राय यांचा ४८४ मतांनी पराभूत केले.