एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:29 IST2025-07-21T17:14:08+5:302025-07-21T17:29:53+5:30
Ahmedabad plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात कसा झाला याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत, दरम्यान, खालील पाच गोष्टींचा उलगडा झाल्यावर हा अपघात कसा झाला, या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे, तसेच अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या विमान अपघातात शेकडो प्रवाशांचा बळी गेला होता. दरम्यान, हा अपघात कसा झाला याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यात काही अमेरिकन प्रसारमाध्यमांनी विमानाच्या वैमानिकाने जाणीवपूर्वक इंजिनाला इंधन पुरवठा करणारे दोन्ही स्विच बंद केल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा भारतीय यंत्रणांनी फेटाळून लावला आहेत. तसेच अमेरिकन विमान कंपनी बोईंगला वाचवण्यासाठी असे दावे केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर खालील पाच गोष्टींचा उलगडा झाल्यावर हा अपघात कसा झाला, या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
इंधनाच्या स्विचच्या कटऑफची कमांड
इंधन पुरवठा चालू किंवा कटऑफ करण्यासाठी थ्रॉटल कंट्रोल बॉक्स युनिटची डुप्लिकेट टेस्ट केली जाऊ शकते. त्या माध्यमातून कटऑफ कमांड इलेक्ट्रॉनिक त्रुटीमुळे झाली होती की यामध्ये वैमानिकाची चूक होती हे समोर येईल.
वैमानिकांच्या शेवटच्या संभाषणाची टाइम लाईन
तुम्ही इंधन पुरवठा करणारा स्विच का बंद केला, असं एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारलं होतं. तेव्हा त्या वैमानिकाने मी काहीच केलं नाही, असं सांगितलं. आता त्यावेळी नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी सीव्हीआर (कॉकपिट डेटा रेकॉर्डर) आणि एफडीआर (फ्लाइट डेटा रेकॉर्डर)ची टाइमलाइन समान असणं आवश्यक आहे.
कॉकपिट व्हाइस रेकॉर्डरमध्ये स्विचचा आवाज आहे की नाही
फ्यूएल कंट्रोल स्विच फिरवल्यावर एक क्लिकिंगचा आवाज येतो. तो सीव्हीआरच्या एरिया माईकमध्ये रेकॉर्ड होतो. जर आवाज रेकॉर्ड झाला नसेल तर हा स्विच मॅन्युअली बंद करण्यात आलेला नाही, हे स्पष्ट होईल.
एफएएच्या सूचनांचं पालन झालेलं आहे की नाही
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने २०१८ मध्ये फ्लूएल स्विच लॉकिंग मेकॅनिझम बाबत महत्त्वपूर्ण सूचना दिली होती. तपास यंत्रणांनी मेंटेनन्स रेकॉर्ड, सर्व्हिस बुलेटिन लॉग्स, डीजीसीएकडून क्लिअरन्स कॉपीची मागणी केली आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं ही संचालनामधील गंभीर हलगर्जी मानली जाईल.
इंजिनाचे वॉल्व्ह उघडणे आणि बंद होण्याची तपासणी
कुठल्या सेंसरने काय संकेत दिला होता, प्राथमिक अहवालामध्ये याचा काहीही उल्लेख नाही आहे. एएआयबीने जीई आणि बोईंगकडून या चॅनेलचा रेकॉर्ड मागिता आहे. तसेच ३२ सेकंदांमध्ये कुठलं इंजिन पुन्हा सुरू करता येऊ शकतं की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे.