पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:43 IST2026-04-07T12:36:44+5:302026-04-07T12:43:39+5:30

पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कोलकातावर हल्ला करण्याची पोकळ धमकी दिल्यानंतर आता भारतानेही आपली इलेक्ट्रॉनिक युद्धाची क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताने ११ आणि १२ एप्रिल रोजी बंगालच्या उपसागरात २ दिवसीय ग्लोबल नेविगेशन सॅटेलाईट सिस्टम जॅमिंग ट्रायल आयोजित केले आहे. यासाठी अनेक विभागांना नोटम जारी करण्यात आला आहे.

या ट्रायलचा हेतू आधुनिक युद्धाच्या परिस्थितीत सॅटेलाईट आधारित नेविगेशन सिस्टमला नुकसान पोहचवणाऱ्या तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी आहे. जे GPS सह विविध GNSS नेटवर्क सिग्नलमध्ये अडथळा अथवा निष्क्रिय करू शकते.

या चाचणीत याची पडताळणी केली जाईल की जर युद्ध परिस्थिती उद्भवली तर शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, मिसाइलसह अन्य नेविगेशनने चालणाऱ्या शस्त्रांमधील नेविगेशन सिस्टम कशी खराब करता येईल आणि त्यांच्या हल्ल्याला छेद देता येईल हे पाहिले जाणार आहे.

या सरावादरम्यान संरक्षण यंत्रणा अनेक मापदंडांवर लक्ष ठेवतील. ज्यामध्ये सिग्नलमधील व्यत्ययाची व्याप्ती, जॅमिंग प्रणाली काम करण्याचे अंतर आणि तिची अचूकता यांचा समावेश आहे. माहितीनुसार, याबाबत हवाई दलासह अनेक विभागांना नोटम जारी करण्यात आला आहे. ही संपूर्ण चाचणी पूर्णपणे नियंत्रित परिस्थितीत केली जाईल. जेणेकरून नागरी विमान वाहतूक, सागरी वाहतूक यांना कुठलाही धोका निर्माण होणार नाही.

विशेष म्हणजे, बंगालच्या उपसागरच चाचणी स्थळ म्हणून निवड करण्यात आले, कारण ते भारताच्या सागरी सुरक्षा पायाभूत सुविधा आणि हिंद महासागर क्षेत्रातील प्रमुख कार्यक्षेत्रांच्या जवळ आहे. या प्रदेशात चाचण्या घेतल्याने हवाई हल्ल्यांची खरी अचूकता तपासता येईल.

सिग्नल बाधित करण्याची व्याप्ती, इंटरफेरेंसची तीव्रता, सिस्टमची स्थिरता, प्रत्यक्ष परिस्थितीत उपकरणांचा प्रभाव याची चाचणी घेतली जाईल. जीएनएसएस जॅमिंग तंत्रज्ञानाचा उपयोग शत्रूची अचूक शस्त्रे, ड्रोन आणि नेटवर्क-आधारित लष्करी प्रणाली निष्क्रिय करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे भारताच्या नौदल आणि किनारी सुरक्षा साधनांची सुरक्षा क्षमता अधिक मजबूत होईल.

युद्धात कसा होणार फायदा? - युद्धाच्या वेळी GPS जॅमिंग केल्याने शत्रूचे ड्रोन दिशा भरकटू शकते. मिसाइलचे अचूक टार्गेट चुकू शकते. जहाज आणि विमाने यांची नेविगेशन सिस्टम खराब होऊ शकते. त्याशिवाय कमांड आणि कंट्रोल सिस्टम खंडीत होईल. GPS जॅमिंग शत्रूवर विना थेट हल्ला करताही त्याला प्रचंड नुकसान पोहचवू शकते.

GPS जॅमिंगच्या घटनांमध्ये वाढ - अलीकडच्या काही वर्षात जगातील अनेक क्षेत्रात GPS जॅमिंग आणि स्पूफ्रिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ते पाहता भारत इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवत आहे. ज्यात VHF-UHF कम्युनिकेशन जॅमर आणि मोबाइल EW प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

पाकिस्तानी संरक्षण मंत्र्‍यांची धमकी - शनिवारी सियालकोट येथे पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताकडून कुठलेही पाऊल उचलले गेले तर आमचे प्रत्युत्तर कोलकातापर्यंत असेल असं सांगत २००० किमी दूर अंतरावरील कोलकातावर हल्ला करण्याची थेट धमकी दिली होती.

त्याशिवाय दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरमध्ये नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्य प्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वात पाकिस्तान जागतिक व्यासपीठावर भारताची प्रतिमा खराब करणे आणि त्याला आव्हान देण्यासाठी एका मोठ्या 'इन्फॉर्मेशन ऑपरेशन' प्लॅनवर काम करत आहेत. सैन्य पातळीवर पाकिस्तान भारताचा मुकाबला करू शकत नाही त्यासाठी मुनीर यांनी नवा कुरापती प्लॅन आखला आहे.