Omicron विरोधात Covishield किती प्रभावी हे दोन-तीन आठवड्यांत समजेल : अदर पूनावाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:49 AM2021-12-01T08:49:33+5:302021-12-01T08:59:43+5:30

Coronavirus : तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. परंतु त्यापूर्वी सर्वांना दोन्ही डोस देणं आवश्यक असल्याचं पूनावाला यांचं मत.

जगभरात जनजीवन पूर्वव्रत होत असतानाच आता ओमायक्रॉन (Omicron) या विषाणूचा प्रादुर्भाव पसरत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिअंटविरोधात कोविशील्ड (Coronavirus Vaccine Covishield) ही किती प्रभावी आहे हे येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये समजेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी दिली.

"ओमायक्रॉन हा विषाणू किती गंभीर आहे किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही. परंतु ओमायक्रॉनकडे पाहता बूस्टर डोस शक्य आहे," असंही पूनावाला म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं.

दरम्यान, सरकारनं आता सर्वांनाच प्रथम दोन डोस देण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. 'दरम्यान, कोविशील्ड ही लस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा सामना करण्यास सक्षम होती, तसंच रुग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यू होण्याचीही शक्यता कमी होती,' असं लॅन्सेन्टच्या अहवालातून सांगण्यात आलं होतं.

कोविशील्डच्या ओमायक्रॉन या विषाणूवरील प्रभावीपणावर सध्या अभ्यास सुरू आहे आणि आपल्याला काही आठवड्यांची वाट पाहावी लागेल. ऑक्सवर्डच्या वैज्ञानिकांकडून यावर संशोधन सुरू आहे. तसंच त्यांच्या निष्कर्षांच्या आधारावर येत्या सहा महिन्यांमध्ये आम्ही नवी लस आणू शकतो जी बूस्टर डोस प्रमाणे सादर केली शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काळानुसार कोविशील्डचा प्रभाव कमी होईलच असं नाही. प्रथम सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देणं आवश्यकआहे. त्यानंतरच इम्युनिटी वाढवण्यासाठी बूस्टर डोसचा विचार केला जाऊ शकत असल्याचं पूनावाला यांनी नमूद केलं.

जर सरकारनं बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही लसीचा पुरवठा करण्यासाठी तयार आहोत. पूनावाला यांच्या माहितीनुसार खासगी बाजारपेठेत बूस्टर डोस हा ६०० रूपयांना मिळो शकतो, तसंच तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. परंतु त्यापूर्वी दोन्ही डोस देणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

"आमच्याकडे लाखो लसींचा साठा आहे. आम्ही २० कोटी डोस हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यासाठी सुरक्षित ठेवले आहेत. अशातच जर सरकारनं बूस्टर डोसची घोषणा केली तर त्याचा पुरवठा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"आमच्याकडे कोवोवॅक्सचेही (Covovax) डोस उपलब्ध आहेत. याच्या वापरासाठी पुढील काही आठवड्यांमध्ये मंजुरी मिळू शकते. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कोवोवॅक्स डोस भारतात उपलब्ध करू दिले जाऊ शकतात," असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं.

भारत फार्मसी ऑफ द वर्ल्डची भूमिका साकारण्यासाठी तयार आहे. आम्ही केवळ भारतच नाही, तर जगाच्या गरजेप्रमाणे आमच्याकडे आवश्यक लसीचे डोस उपलब्ध आहेत हा आमचा जगाला संदेश असल्याचं त्यांनी सांगितलं.

आम्ही दर महिन्याला २५ कोटी लसीच्या डोसचं उत्पादन करतो आणि सहा महिन्यांमध्ये १ अब्ज डोस पुरवण्याचं ध्येय गाठू शकतो. येणाऱ्या काळात भारतीय वॅक्सीन इंडस्ट्रीला कच्च्या मालासाठी दुसऱ्या देशांवरही अवलंबून राहावं लागणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.