आनंदाची बातमी! देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 01:31 PM2021-01-28T13:31:05+5:302021-01-28T13:42:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची एक अत्यंत दिलासादायक आकडेवारी दिली आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही वेगाने वाढत आहे. भारतातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा एक कोटीवर पोहोचला आहे.

देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 1,53,847 झाला आहेत. आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 1,03,73,606 वर गेला आहे. याच दरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची एक अत्यंत दिलासादायक आकडेवारी दिली आहे. देशभरातील तब्बल 147 जिल्ह्यांमध्ये मागील सात दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.

18 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत तर सहा जिल्ह्यांमध्ये मागील 21 आणि 21 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरसच्या 70 टक्के केसेस या महाराष्ट्र व केरळमधील असून आतापर्यंत भारतात 153 यूके व्हेरिएंटची प्रकरणं आढळली असल्याचं देखील डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,07,01,193 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,53,847 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,666 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 123 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.

देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. उपाचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशाच्या रिकव्हरी रेटमध्ये ही वाढ होत आहे. आणि मृत्यूदरामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

27 जानेवारीपर्यंत देशभरात 19,43,38,773 नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. यापैकी 7 लाख 25 हजार 653 नमूने काल तपासले गेले असल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहेय

कोरोना बळींपैकी 70 टक्के लोक हे एकापेक्षा अधिक व्याधींनी त्रस्त होते. आतापर्यंत 19 कोटी 43 लाख लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत 20 लाख लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने 1 कोटींचा पल्ला 19 डिसेंबरलाच गाठला होता. भारतातील कोरोना रुग्ण, या आजाराचे बळी, उपचाराधीन रुग्ण यांची संख्या अमेरिकेतील अशा रुग्णांपेक्षा कमी आहे.

जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे.

भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसींचा डोस विकत घेण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जात आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. जगात कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल 10 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 101,458,805 वर पोहोचली आहे.

कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 2,184,712 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 73,351,625 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.