CoronaVirus News: पत्नी रुग्णालयातून जाताच पतीनं प्राण सोडला; अवघ्या काही तासांत अर्धांगिनीनं जीवनप्रवास संपवला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 04:30 PM2021-04-15T16:30:29+5:302021-04-15T16:35:40+5:30

CoronaVirus News: कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का सहन न झालेल्या पत्नीची चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध आणले जात आहेत. मात्र अद्याप तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाहीए.

दहा दिवसांपूर्वी देशात पहिल्यांदा कोरोनाचे १ लाख नवे रुग्ण आढळून आले. आज हाच आकडा २ लाखांपुढे जाऊन पोहोचला आहे. गेल्या १३ दिवसांत देशात १४ लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोना रुग्णांपाठोपाठ मृतांची संख्यादेखील वाढत आहे. गेले दोन दिवस देशात १ हजारहून अधिक कोरोना रुग्णांचा प्राण गेला आहे. हजारो कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली आहेत.

नांदेडच्या लोहा शहरात वास्तव्यास असलेल्या शंकर गंदम (वय ४० वर्षे) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी पद्मा (वय ३५ वर्षे) यांनी मुलगा लल्लीसह (वय ३ वर्षे) आत्महत्या केली.

शंकर आणि पद्मा तीन मुलांसह लोहा शहरात राहत होते. मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले शंकर मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचं पोट भरायचे.

शंकर गंदम यांनी मंगळवारी लोह्यातील ग्रामीण रुग्णालयात अँटिजेन चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी लगेच त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतलं.

संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पद्मा पतीला भेटण्यासाठी रुग्णालयात आल्या. पती-पत्नीची ही अखेरची भेट ठरली.

पद्मा रुग्णालयातून जाताच काही वेळातच शंकर यांची प्राणज्योत मालवली. ही माहिती समजताच पद्मा यांना धक्का बसला. पतीच्या अकाली निधनामुळे बसलेला धक्का त्या पचवू शकल्या नाहीत.

बुधवारी पहाटे पद्मा त्यांच्या दोन मुलींना घरी ठेवून मुलगा लल्लीसह निघाल्या. त्यांनी मुलासह तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.

शंकर यांचं निधन आणि त्यापाठोपाठ पद्मा यांनी केलेली आत्महत्या यामुळे दोन लहान मुली अनाथ झाल्या आहेत. त्यांचा सांभाळ कोण करणार हा प्रश्न आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.