दिवाळीत फटाका खरेदी-विक्री करताना काय काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 12:40 IST2023-11-07T12:25:06+5:302023-11-07T12:40:14+5:30
दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांना गमवावी लागतेय दृष्टी

प्रकाशाचा उत्सव म्हणजे दीपावली. या उत्सवासाठी आतापासूनच घरोघरी तयारी सुरू झाली आहे. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक जण या आनंदात सहभागी होताना दिसतात. फटाक्यांचे आकर्षण तर सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते.

फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते. फटाके फोडत असताना ते पेटविल्यावर योग्य अंतर राखा. त्याच्याजवळ जाऊ नका, त्यामुळे कोणतीही अघटित घटना घडू शकते. जळते फटाके हातात घेऊ नका किंवा हवेत उडवू नका.

फटाके वाजवत असताना लहान मुले आजूबाजूला असतील, तर त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांना जवळ येऊ देऊ नका. नेहमी पाण्याची बादली जवळ ठेवा. रस्त्यावर अनेक लोक फटाके वाजवत असल्याने हेल्मेट घालावे. सर्वानी फटाक्यांबाबत योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे.

फटाका विक्रेत्यांनी काय काळजी घ्यावी?
फटाका विक्रेत्यांनी दूर वस्तीत स्टॉल लावावे. मध्य वस्तीत स्टॉल लावू नये. गर्दीच्या ठिकाणी स्टॉल लावू नयेत. जास्त मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत असाल, तर तशी माहिती त्या ग्राहकाला द्या. त्याची तीव्रता सांगणे खरोखर गरजेचे आहे.

परवाना आवश्यक
ज्या जागेत फटाका स्टॉल उभारावयाचे आहेत, त्या जागेचा नकाशा, स्टॉल ग्रामपंचायत हद्दीत असेल, पालिका हद्दीत असेल तर त्यांची शिफारस आवश्यक आहे.

५० मीटर परिसरात बंदी
मुदत संपलेले तसेच शोभेच्या फटाक्यांची विक्री करता येणार नाही. रस्त्यात किंवा रस्त्यापासून १० मीटरच्या अंतराच्या आत फटाके किंवा रोषणाईचे फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. फटाक्यांच्या दुकानाच्या ५० मीटरच्या परिसरात फटाके उडविण्यास बंदी आहे.

आवाजाचे बंधन तोडाल, तर होईल कारवाई
फटाका विक्री स्टॉल परिसरात आतषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे. दिवाळीत १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे फटाके फोडण्यास, तसेच आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीस मनाई असते. शिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

मुलांच्या बाबतीत काय काळजी घ्यावी?
अरुंद गल्ल्यांमध्ये फटाके वाजवू नका. शक्यतो, मोकळे क्षेत्र आणि उद्याने वापरा. सिंथेटिक कपडे घालू नका. शक्यतो, जाड, सुती कपडे घाला. सैल लटकलेले कपडे घालू नका. सर्व कपडे व्यवस्थित सुरक्षित करा. जळालेल्या जागेवर कोणतेही क्रीम किंवा मलम किंवा तेल लावू नका. इलेक्ट्रिकल वायरिंगपासून दूर मोकळ्या जागेत फटाके फोडा. गर्दीची ठिकाणे टाळा.

















