फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 21:10 IST
1 / 10२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले. त्यात सर्वात जास्त जागा जिंकून भाजपा नंबर वनचा पक्ष बनला. १३२ जागा एकट्या भाजपाने जिंकल्या. त्याखालोखाल ५७ जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने तर ४१ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकल्या.2 / 10विधानसभा निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येणार हे निश्चित झाले. परंतु मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका महायुतीने लढवल्या होत्या. मात्र भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत राज्यात पहिल्यांदाच १३२ जागांवर बाजी मारली. त्यामुळे भाजपाचाच मुख्यमंत्री होणार अशी मागणी जोर धरू लागली.3 / 10देवेंद्र फडणवीस राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील असं भाजपा नेते बोलू लागले. परंतु एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगणे पसंत केले. दिल्ली दौरा आणि त्यानंतर परतलेले एकनाथ शिंदे राजकीय घडामोडीत साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी गेले आणि तिथूनच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या झळकू लागल्या. 4 / 10एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. दिल्लीतील बैठकीत भाजपा नेतृत्वाने भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं त्यांना सांगितले. त्यानंतर शिंदे नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर २ दिवसांचा गावी मुक्काम करून एकनाथ शिंदे ठाण्यात परतले तिथेही त्यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा उल्लेख करत भाजपा नेतृत्व घेईल तो निर्णय मान्य असेल असं जाहीर केले.5 / 10एकनाथ शिंदे यांची विधाने आणि शिवसेना नेत्यांकडून शिंदेच मुख्यमंत्री हवेत अशी भाषा त्यामुळे भाजपा महायुतीत नाराजी असल्याचं पुढे आले. त्यातच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे कोणत्या भूमिकेत असणार असा प्रश्न निर्माण झाला.6 / 10एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावे, त्यांनी मंत्रिमंडळाबाहेर राहू नये यासाठी शिवसेना आमदार आग्रह धरत होते परंतु उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारण्यास तयार नसल्याचं समोर आले. शिंदेंना तयार करण्यासाठी पक्षातील आमदार आणि नेत्यांनी प्रयत्न केले परंतु तरीही शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयार नव्हते.7 / 10५ डिसेंबरच्या शपथविधी सोहळ्यात तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला, तेव्हा अद्याप काही ठरले नाही, आमची चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितले. त्याचवेळी अजित पवारांनी यांचे काही माहिती नाही परंतु मी शपथ घेणार आहे असा खोचक चिमटा काढला होता. 8 / 10एकनाथ शिंदेंची नाराजी आणि उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार अशा बातम्या टीव्हीवर झळकू लागल्या त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, त्यानंतर शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयार असल्याचं पुढे आले. 9 / 10शिंदे-फडणवीस भेटीत नेमकी काय चर्चा झाली त्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला. एका मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री व्हावे की नाही असा प्रश्न शिंदेसमोर होता. मी त्यांना माझा अनुभव सांगितला. तुम्हाला एक पक्ष चालवायचा आहे. माझ्या पक्षात अनेक नेते, संघटन आहे. दिल्लीत राष्ट्रीय नेते आहेत. परंतु तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा असलेला पक्ष आहे असं मी म्हटलं. 10 / 10विभाजन झाल्यानंतर तुलनेने चांगले यश मिळालेला तुमचा पक्ष आहे. अशा परिस्थितीत तुम्ही बाहेर राहून पक्ष चालवणं कठीण आहे. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आले पाहिजे. शिंदेंनी ते मान्य केले. माझ्या चेहऱ्यावर जसं हास्य असते तसं शिंदेंच्या चेहऱ्यावर फार हास्य नसते. ते मुख्यमंत्री असतानाही त्यांचा चेहरा तसाच होता हे कुणी पाहिले नाही. उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर ते नाराज आहेत असा अंदाज बांधायला सुरूवात झाली असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.