"आणखी धक्के बसतील"... "आपण घरीच पूजा करू"... देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' वाक्यांचा अर्थ काय होता?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 01:16 PM2022-07-02T13:16:53+5:302022-07-02T14:04:35+5:30

Devendea Fadanvis: एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या हालचालींना सुरुवात झाली आणि भाजप व शिंदे गट असे सरकार स्थापन करण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर काहीच दिवसांत शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे ठरविण्यात आले होते. त्याचवेळी आपण मंत्रिमंडळात नसणार, असा शब्द फडणवीस यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून घेतला; पण ऐनवेळी नेतृत्वाच्या आदेशामुळे त्यांना नाखुषीने उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागले, अशी माहिती आता समोर आली आहे. (यदू जोशी)

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या हालचालींना सुरुवात झाली आणि भाजप व शिंदे गट असे सरकार स्थापन करण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर काहीच दिवसांत शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे ठरविण्यात आले होते. त्याचवेळी आपण मंत्रिमंडळात नसणार, असा शब्द फडणवीस यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून घेतला; पण ऐनवेळी नेतृत्वाच्या आदेशामुळे त्यांना नाखुषीने उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागले, अशी माहिती आता समोर आली आहे.

भाजपची पुन्हा सत्ता येणार असेल, तर माझा मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही आग्रह असणार नाही, पक्षासाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे, असे फडणवीस यांनी पक्षाला सुरुवातीलाच सांगितले होते.त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली होती. शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द भाजपच्या श्रेष्ठींनी दिला होता. याची कल्पना केवळ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना होती, असे म्हटले जाते.

विधान परिषद निवडणुकीच्या रात्रीच शिवसेनेत बंड झाले. दोन दिवसांनी एका जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी फडणवीस यांचे अभिनंदन करायला सागर बंगल्यावर गेले. तुम्ही तर खूप मोठा धक्का दिला, असे एक पदाधिकारी म्हणाला. त्यावर, फडणवीस म्हणाले आणखी धक्के बसतील.

भाजपचे दोन-तीन आमदार सागर बंगल्यावर फडणवीस यांच्याशी बोलत होते. एक आमदार म्हणाले, ‘‘आता तुम्ही लवकरच वर्षा बंगल्यावर जाणार. फडणवीस त्यावर म्हणाले, नाही मी इथेच राहणार आहे, बंगला कुठे बदलता?

एक आमदार फडणवीस यांना म्हणाले, ‘तुम्ही आषाढी एकादशीच्या महापूजेला पंढरपूरला जाणार तर!’, फडणवीस त्यावर त्यांचे चिरपरिचित हास्य देत म्हणाले, ‘‘आपण घरीच पूजा करू”. त्यांच्या बोलण्याचा अर्थ आमदारांना कळला नाही.

फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी राजभवनवर जाण्यापूर्वी आपल्या सागर बंगल्यावर सांगितले की, शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे निश्चित झाले आहे, मी मंत्रिमंडळात नसेन. तेव्हा तिथे उपस्थित भाजपचे आमदार हादरले. काहीजण रडायला लागले, तुम्ही मुख्यमंत्री होणार नसाल तर आम्हाला मंत्रिपदही नको अन् सरकारही नको, असे म्हणत काही आमदारांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

असे म्हणतात की, आपण मंत्रिमंडळात नसू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर पक्षाच्या अनेक आमदारांनी पक्षाचे प्रभारी सी. टी. रवी यांना अक्षरश: घेरले. फडणवीस नसतील तर आमची कामे कशी होतील, आम्हाला मार्गदर्शन कोण करेल, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. सी. टी. रवी यांनी तत्काळ ही भावना पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि नड्डा यांच्या कानावर घातली आणि डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगण्यात आले.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी २९ जूनला दुपारी ट्विट केले. त्यावेळी त्या लंडनमध्ये होत्या. तेथील स्वामिनारायण मंदिरात पूजा केल्याचे फोटो आणि संबंधित मजकूर त्यांनी ट्विट केला व शेवटी लिहिले, ‘‘लोकशाहीचा मंत्र आपण कधीही विसरता कामा नये; ‘‘आधी जनता, नंतर पक्ष आणि शेवटी मी’’. या ट्विटचा अर्थ आता असा घेतला जात आहे की, अमृता यांनी देवेंद्र हे पक्षासाठी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.