आयुष्यातील दिल्लीतील 'ती' पहिली राजकीय बैठक, जिथं...; शरद पवारांनीच सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 09:24 IST2025-02-21T09:12:00+5:302025-02-21T09:24:19+5:30

दिल्लीच्या संसदीय राजकारणामध्ये ज्यांना रस आहे तसंच त्यासाठी कष्ट करून येथे प्रवेश करण्यासाठी, आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकष्टा करतात असं पवार म्हणाले.

अनेकांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही दिल्ली मधूनच झाली. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती संसदेमध्ये येण्यासाठीच आली आहे असं नाही असं सांगत शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यातील दिल्लीतील पहिल्या राजकीय पक्षाच्या बैठकीचा रंजक किस्सा सांगितला

राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर राजकीय पक्षांशी, राजकीय नेतृत्वांशी आणि राजकीय संघटनांशी सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता असते आणि त्या सुसंवादाचा केंद्र हे दिल्लीच आहे असं पवारांनी म्हटलं. निलेशकुमार कुलकर्णी लिखित 'संसद भवन ते सेंट्रल विस्टा: आठवणींचा कर्तव्यपथ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, मी आता सहज विचार करत होतो की, मी दिल्लीमध्ये कधी आलो? मी दिल्लीमध्ये आलो १९६२-६३ ला त्याआधी मी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघटनेमध्ये काम करत होतो आणि त्याची एक राष्ट्रीय समिती होती. त्या राष्ट्रीय समितीची बैठक होती. त्या राष्ट्रीय समितीच्या मार्गदर्शक इंदिरा गांधी होत्या आणि ती बैठक बोलावली होती ती 'त्रिमूर्ती'ला असं त्यांनी सांगितले.

'त्रिमूर्ती' हे पं. जवाहरलाल नेहरूंचं निवासस्थान, इंदिरा गांधींचं निवासस्थान आणि 'त्रिमूर्ती'ला बैठक आहे असं आम्हाला सगितलं. पं. जवाहरलाल नेहरू येणार आहेत, इंदिरा गांधी अध्यक्ष असतील. आम्ही अतिशय औत्सुक्याने त्या बैठकीला गेलो. मी होतो, वायलर रवी नावाचे आमचे एक केरळचे एक मित्र होते, नंतर ते मंत्रीही झाले. त्याशिवाय अनेक राज्यांचे तरुण नेते होते अशी आठवण त्यांनी काढली.

आमच्या आयुष्यातला हा आगळावेगळा प्रसंग होता आणि आम्ही अतिशय आनंदित होतो. आधी दोन दिवस आम्ही एकत्र आलो आणि काय बोलायचं, कोणते मुद्दे मांडायचे, कोणत्या गोष्टीचा आग्रह धरायचा त्याबद्दल आम्ही आमच्या-आमच्यात चर्चा करत होतो, सुसंवाद करत होतो. आम्ही विषय वाटून घेतले असं शरद पवार म्हणाले

त्यानंतर मी कशावर बोलायचं, बाकी आमचे सहकारी होते त्यामध्ये मध्यप्रदेश मधून अर्जुन सिंग होते, अन्य राज्यातून असे तरुण नेते होते जे नंतर मोठे नेते झाले. आम्ही सगळे विषय वाटून घेऊन त्या बैठकीला गेलो. आयुष्यात पहिल्यांदा नेहरूंना पुण्यातील एका कार्यक्रमात जवळून बघितलं होतं असं शरद पवारांनी सांगितले.

तर पंडित नेहरू कधी राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी येत असत आणि फुटपाथवरून आम्ही त्यांना पाहत असू पण ३० लोकांच्या बैठकीमध्ये त्यांच्यासमोर आम्ही बसलो होतो आणि ठरवलं होतं की त्यांना हे प्रश्न विचारायचे, इंदिरा गांधींना ते प्रश्न विचारायचे आणि त्या तयारीने आम्ही बैठकीत बसलो असं पवार बोलले.

परंतु हे दोन्ही नेते आले आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही त्यांच्याकडे बघतच बसलो. त्यांना प्रश्न विचारायचं धाडस हे आम्हा लोकांना झालं नाही कारण ते व्यक्तिमत्वच इतकं मोठं होतं त्यांच्यासमोर बोलणं हे आम्हा लोकांना शक्य झालं नाही असं शरद पवारांनी म्हटलं.

दरम्यान, माझ्या आयुष्यातील दिल्लीतील राजकीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती आणि जिथे उत्तुंग नेत्यांना जवळून भेटता आलं पण तोंडातून एक शब्द बाहेर निघाला नाही असंही शरद पवारांनी आठवण सांगितली.