शिंदे गट फुटण्याची भीती; मोहित कंबोज ट्विट म्हणजे भाजपाचा 'प्लॅन बी' सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 04:09 PM2022-08-17T16:09:14+5:302022-08-17T16:14:12+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात एका ट्विटनं मोठी खळबळ माजली आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यानंतर राष्ट्रवादीचा बडा नेता जेलमध्ये जाणार? अशा आशयाचे ट्विट भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कंबोज यांनी केलेल्या ट्विटमुळे पहिलाच दिवस चांगलाच गाजला आहे.

मोहित कंबोज यांच्या ट्विटवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. परंतु सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात ज्यांचं प्रामुख्याने नाव येत होते त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या ट्विटवरून भारतीय जनता पार्टीसह सर्व राजकीय नेत्यांना टोला लगावला आहे. त्यासोबत राज्यातील राजकीय समीकरणात भाजपाचा 'प्लॅन बी' सुरु झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नेमकं काय म्हणाल्या दमानिया जाणून घेऊया.

अंजली दमानिया म्हणाल्या की, सिंचन घोटाळा हा खूप मोठा आहे. ७२ हजार कोटींचा घोटाळा झाला असताना त्याकाळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत सरकार बनवायचं होतं तेव्हा एकदिवस आधीच अजित पवारांना क्लीनचीट दिली होती. सिंचन घोटाळ्याला पूर्णविराम दिला होता. यामुळे आमच्यासारख्या लोकांना अतिशय दु:ख, राग आला होता.

परंतु आज अचानक मोहित कंबोज यांनी ट्विटरवरून सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. मी आजपर्यंत त्यांना फॉलो केले नाही परंतु आता फॉलो करावं लागेल कारण महाराष्ट्रात पुढे काय घडणार याबाबत त्यांना माहिती असते. किरीट सोमय्यांना रिटायर्ड करून मोहित कंबोज यांना भाजपानं पुढे आणलं असावं असंही दमानिया यांनी म्हटलं.

अधिवेशन सुरू होत असताना विरोधी पक्षाने जास्त आवाज उचलू नये यासाठी कंबोज यांनी हे ट्विट केले का? सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी लावू असं म्हटलं का? शिवसेनेचा शिंदे गट जर फुटला तर हा भाजपाचा प्लॅन बी आहे जर हे झाले तर राष्ट्रवादीची पुन्हा गरज लागेल. त्यासाठी हे सूतोवाच आहेत का? असा अंदाज दमानिया यांनी व्यक्त केला.

सध्या राज्यात शिवसेनेत शिंदे विरुद्ध ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट एकमेकांना शह देण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. यातच आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी शिंदेंसह १६ जणांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. यावर अद्याप ठोस निर्णय झाला नाही.

शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा याबाबत दोन्ही गटांनी विविध याचिका दाखल केलेल्या आहेत. याबाबत न्यायालय निर्णय देईल. मात्र तत्पूर्वी शिंदे गटात मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून नाराजी असल्याचंही समोर आलं आहे. अनेकांना मंत्रिपदाचा शब्द दिला परंतु पहिल्या विस्तारात नाव नसल्याने नाराजी आहे. ही नाराजी उघडपणेही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट फुटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत, आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन संबंधित बड्या नेत्याचा खुलासा करणार आहोत, असेही म्हटले आहे. याशिवाय, आपण संबंधित नेत्याची देशातील आणि परदेशातील मालमत्ता, बेनामी कंपन्या, खास मैत्रिणीच्या नावावर असलेली मालमत्ता, मंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या अनेक खात्यांच्या माध्यमातून केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्ता, यांसंदर्भात मोठा खुलासा करणार असल्याचेही कंबोज यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता ती खास मैत्रीण कोण? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील शिवसेनेचे ४० आमदारांनी शिंदे गटात सामील होत बंडखोरी केली असून शिवसेनेला चांगलाच हादरा दिला आहे. सततची न्यायालयीन लढाई त्यातच मूळ शिवसेनेकडून बंडखोरांवर मारण्यात आलेला गद्दारीचा शिक्का या सगळ्या पार्श्वभूमीवर जर शिंदे गट फुटला तर भाजपासाठी पुढचा प्लॅन काय असेल याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.