ऐतिहासिक वारसा असलेले महाराष्ट्रातील 7 आश्चर्य बघाल तर जगातले 7 आश्चर्य विसराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:49 PM2020-01-13T15:49:19+5:302020-01-13T16:09:33+5:30

महाराष्ट्र समुद्रकिनारे, हिल स्टेशन, ऐतिहासिक स्मारके यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे स्वत: चे 7 चमत्कार आहेत त्याला 7 वन्डर्स असे म्हटले जाते. त्यापैकी काही प्राचीन स्थळे आहेत तर काही आपल्यासाठी केवळ निसर्गाची देणगी आहेत.

स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड होय. या डोंगरी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ८२० मीटर आहे. या किल्ल्याला अजून १५ नावानी संबोधले जाते. गडाला १४३५ पायऱ्या आहेत. अवघड व दुर्गम भागातील भागातील हा गड एक पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेला आहे. गडावर एकूण २५ हून अधिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

एका उल्कापातामुळे निर्माण झालेले खा-या पाण्याचे सरोवर म्हणून हे सरोवर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या परिसारत बाराशे वर्षांपूर्वीची १५ मंदिरे अस्तित्वात आहेत. या सरोवराचे क्षेत्रफळ १.१३ चौ.कि.मी. इतके असून सरासरी खोली १३७ मीटर आहे. अमेरिकेतील अनेक संस्थांनी येथे येऊन संशोधन केलेले आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या वाघुर नदीच्या परिसरात ही लेणी अस्तित्वात आहेत. ही लेणी नदीपात्रापासून ४० ते १०० फुट उंचीवर डोंगररांगांमध्ये कोरलेली आहेत. या लेण्यांत गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्र तसेच बौद्ध तत्वज्ञान चित्रशिल्प रुपात तयार केले आहे.

या पठारावर पावसाळ्यात असंख्य रानफुले फुलतात. या फुलांमध्ये अनेक दुर्मिळ प्रकारची फुले आढळून येतात. हे पठार विविध प्रकारची फुले आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराचे क्षेत्रफळ १० चौ.कि.मी. असून पठारावर २८० फुलांच्या जाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. रंगीबेरंगी फुले व फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांची येथे तुडुंब गर्दी असते.

हे रेल्वे स्थानक व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त १८८७ मध्ये बांधले गेले आहे. मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक व मध्य रेल्वेचे मुख्यालय अशी याची ओळख आहे. सर्वात व्यस्त व गजबजलेले स्थानक अशीही याची ख्याती आहे. या स्थानकावर एकूण १८ फलाट आहेत. २००८ साली अतिरेक्यांनी याच स्थानकावर अतिरेकी हल्ला केला होता.

हा गड यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मेंढातोफ होय. या तोफेत एकाच माऱ्यात पूर्ण गड उध्वस्त करण्याची क्षमता होती. ती तोफ पंचधातूंपासून बनवलेली आहे. प्राचीन काळातील गड म्हणून हा गड प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावाजला गेला आहे. या गडावर लोक भरपूर प्रमाणात भेट देतात.

हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा खांब-विरहित पॅगोडा आहे, जो मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला आहे. गौतम बुद्धांच्या स्मृतींची जपणूक करण्यासाठी हा पॅगोडा बांधण्यात आलेला आहे. या पॅगोडाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पती यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी २००९ साली करण्यात आले. हा पॅगोडा शांती आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दररोज येथे दीड ते दोन हजार पर्यटक भेट देत असतात. स्तूपाच्या कळसाची उंची २९ मी. असून भूकंपरोधक आहे. एकावेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे.