Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण अन् शांताबाई राठोड यांच्यातील नात्याचा उलगडा; लहू चव्हाण खोटं बोलले?

By प्रविण मरगळे | Published: March 3, 2021 09:06 PM2021-03-03T21:06:22+5:302021-03-03T21:12:47+5:30

Pooja Chavan Suicide Case, Who is Shantabai Rathod: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर एक नाव प्रामुख्याने चर्चेत येतंय ते म्हणजे शांताबाई राठोड, शांताबाई राठोडांनी या प्रकरणात पूजाच्या कुटुंबीयांवरच ५ कोटी घेतल्याचे आरोप केले, त्यानंतर माझी हत्या होण्याची शक्यता आहे असा मोठा दावाही केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शांताबाई राठोड यांनी तपासाला वेगळचं वळण दिलं आहे, पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांना संजय राठोड यांच्याकडून ५ कोटी मिळालेत असा दावा त्यांनी केला आणि संपूर्ण प्रकरणात एक ट्विस्ट निर्माण झाला.

पूजा चव्हाण आणि शांताबाई राठोड यांचे खरचं नातं होतं का? असा प्रश्न उपस्थित होतो, कारण पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्यासोबत आमचं कसलेच नातेसंबंध नाहीत असं म्हटलं होतं, इतकचं नाहीतर शांताबाईंविरोधात त्यांनी परळी पोलीस ठाण्यात बदनामी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात शांताबाई राठोड यांनी माझी हत्या होण्याची शक्यता आहे असं सांगून पुन्हा एकदा या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे, नेमकं शांताबाई राठोड यांच्या विविध विधानांमुळे सध्या चव्हाण-राठोड यांच्या कुटुंबात नेमकं नातं काय? असा प्रश्न उपस्थित होतो,

टीव्ही ९ च्या वृत्तानुसार, शांताबाई राठोड या पूजा चव्हाणच्या चुलत आजी लागतात, त्यासाठी राठोड आणि चव्हाण कुटुंबीयांची वंशावळ पाहावी लागेल, धना चव्हाण हे लहू चव्हाण यांचे पंजोबा, त्यांना ५ मुलं होती, गोविंद, हिरा, राम, धना आणि देवराम चव्हाण असं त्यांचे नाव होते.

यातील गोविंद चव्हाण यांना ५ मुलं झाली, त्यात प्रभू, बाबूराव, चंदू, नंदू आणि बडगू..यातील चंदू हे पूजा चव्हाणचे आजोबा तर लहू चव्हाण यांचे वडील. तर दुसरीकडे देवराम यांना राजेंद्र, संजय आणि विजय अशी ३ मुलं होती, यातील राजेंद्र यांच्यासोबत शांताबाई राठोड यांचा विवाह झाला. त्यामुळे नात्याने लहू चव्हाण हे शांताबाई यांचे पुतणे लागतात.

शांताबाई चव्हाण की शांताबाई राठोड असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला असेल, पण शांताबाई यांचे राठोड हे आडनाव त्यांच्या माहेरचे आहे, शांताबाई माहेरचं आडनाव वापरतात, बीडच्या धारावती तांडा येथे त्यांचे माहेर आहे, आता याच गावातील अरूण राठोड हा तरूण पूजासोबत पुण्यात राहायला होता. तो सध्या गायब आहे.

शांताबाई राठोड यांनी सुरुवातीपासून याप्रकरणात संशय व्यक्त केला आहे, पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे, परंतु पूजा चव्हाणचे कुटुंबीय मात्र या प्रकरणात कोणावरही संशय नसल्याचं सांगत असल्याने यांच्या नात्यातील वादावर आता चर्चा होत आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपा आता थेट हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी यासाठी भाजपाकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या याचिकेत पूजा चव्हाणचा व्हिसेरा खासगी लॅबमध्ये तपासावा, तिच्या शारिरीकस्थितीचे, आजाराचे, कोणती शस्त्रक्रिया केली होती का? याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली आहे, त्याचसोबत संजय राठोड आणि पूजा चव्हाणचे कॉल रेकॉर्डंस तपासावेत असंही म्हटलं आहे.

तर अलीकडेच लहू चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संशयावरून संजय राठोड यांचा बळी देऊ नका, ते समाजाचे नेते आहेत, खूप कष्ट करून इथपर्यंत पोहचले आहेत, असं म्हणत चौकशी करावी, दोषींवर कारवाई कराल असा विश्वास वाटतो असं मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं,

परंतु या पत्रानंतर दुसऱ्याच दिवशी शांताबाई राठोड यांनी लहू चव्हाण यांच्यावर ५ कोटी घेतल्याचे आरोप केले होते, शांताबाईंच्या या आरोपानंतर लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यात म्हटलं की, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे करत आहेत. माझ्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे. शांता राठोड यांनी टीव्हीच्या माध्यमातून आमच्या मुलीशी काही संबंध नसताना स्वतःहून बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोप केले आहेत असा आरोप त्यांनी केला.