दीड वर्षांपूर्वी दिलीप खेडकरांची सोसायटीच्या जिम ट्रेनर, वॉचमनला मारहाण; २०१० मध्ये घटस्फोट, तरीही एकत्र... By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 07:30 AM 2024-07-25T07:30:20+5:30 2024-07-25T07:35:01+5:30
Manorama-Dilip Khedkar, IAS Pooja Khedkar: दोघे पती-पत्नी म्हणून पुण्यातील बाणेर भागातील नॅशनल को- ऑपरेटिव्ह सोसायटीतील, ओम दीप नावाच्या बंगल्यात राहत असल्याची माहितीही आता समोर आली आहे. पुणे : पूजा खेडकर हिने आयएएस होण्यासाठी, तसेच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर केले होते. त्यासाठी तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे तिने सांगितले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतःची माहिती देताना मनोरमा या पत्नी असल्याचा उल्लेख केला होता.
त्यामुळे खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोट अन् त्यासंबंधी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या पती-पत्नीचा घटस्फोट केवळ नॉन क्रिमिलेयरसाठीच तर नव्हता ना, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्राने मनोरमा आणि दिलीप खेडकर या दाम्पत्याचा घटस्फोट खरेच झाला होता का, याचा तपास करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांना तपासाचे आदेश मिळाले.
न्यायालयाच्या आदेशानुसार २०१० मध्ये खेडकर दाम्पत्याचा संमतीने घटस्फोट झाला आहे. त्यांनी २००९ मध्ये पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. २०१० मध्ये त्यांना घटस्फोट मंजूर झाला.
मनोरमा यांनी पोटगीही मागितली नाही एवढेच नाही, तर मनोरमा खेडकर यांनी पोटगी आणि मालमत्तेत हिस्सादेखील मागितला नव्हता. दोन मुलांचा ताबा मनोरमा यांच्याकडेच होता. मात्र, झालेला घटस्फोट फक्त कागदोपत्री होता का, असा प्रश्न पडण्याचे प्रमुख कारण, हे दोघे पती-पत्नी म्हणून पुण्यातील बाणेर भागातील नॅशनल को- ऑपरेटिव्ह सोसायटीतील, ओम दीप नावाच्या बंगल्यात राहत असल्याची माहितीही आता समोर आली आहे.
हा बंगला मनोरमा खेडकर यांच्या नावे असून, दिलीप खेडकर हेदेखील पती या नात्याने सोसायटीचे सदस्य आहेत. त्याबरोबरच दीड वर्षापूर्वी दिलीप खेडकर यांनी सोसायटीच्या कॉमन जिममधील ट्रेनर व सोसायटीच्या वॉचमनला मारहाण केली होती. त्याची तक्रार चतुःशृंगी पोलिस ठाण्यात नोंद आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला होता.
पूजा खेडकरला दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिलेच कसे? • वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र देणाऱ्यांचेही आता धाबे दणाणले आहे. कारण, खोटे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट असल्यास उघडकीस आणावे, अशा सूचना दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या (वायसीएम) डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दोषी आढळल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, असेही आदेशात म्हटले आहे.