तुमच्या पीककर्जाची नोंद सातबारावर आहे का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 02:00 PM2023-05-24T14:00:00+5:302023-05-24T16:38:30+5:30

पीककर्ज घेतल्यास शेतकऱ्याच्या सातबारा उतारावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी शेतकऱ्यांना महसूल विभाग आणि संबंधित बँकांकडे खेपा माराव्या लागतात.

पीककर्ज घेतल्यास शेतकऱ्याच्या सातबारा उतारावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी शेतकऱ्यांना महसूल विभाग आणि संबंधित बँकांकडे खेपा माराव्या लागत असल्याने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी एक लाख ६० हजारांपर्यंत पीककर्ज असल्यास सातबारावर नोंद न करण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात काय स्थिती आहे, याचा आढावा घेतला असता तशा कोणत्याही सूचना तहसीलदारांना केलेल्या नाहीत.

काय आहे भंडारा जिल्ह्यात आदेश? एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत पीककर्ज असल्यास त्याची सातबारावर नोंद करू नये, असे आदेश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना पाठविले आहेत.

सातबारावरील नोंद कमी करण्यासाठी पुन्हा खेटा. आधी घेतलेल्या कर्जाच्या नोंदी असतात. सातबारा उतारा कोरा केल्याशिवाय पुन्हा कर्ज मिळत नाही.

नोंदी कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेकवेळा संबंधित विभागाकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत.

पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळते. सातबारा उताऱ्यावर पीकपाण्याची नोंद करणे.

कर्जाचा बोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे, वारसांची नोंद करणे आदी स्वरूपाची कामे करावी लागतात.

ही कामे ऑनलाइन करायची असली तरी शेतकऱ्यांना संबंधित विभागाकडे वारंवार खेपा माराव्या लागत आहेत.

आपल्या जिल्ह्यात हा आदेश का नाही? भंडारा जिल्ह्यात असा आदेश निघाला आहे; परंतु असा आदेश ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून काढण्यात आलेला नाही.

एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज असल्यास त्याची सातबारावर नोंद करू नये, असा कोणताही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला नाही, अशी माहिती अधीक्षक दीपक कुटे यांनी दिली.