Samruddhi Mahamarg Expressway: समृद्धी महामार्गावरुन जाताना तुम्हाला नेमका किती टोल द्यावा लागेल? दरपत्रक समोर आले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:38 PM2022-09-15T23:38:36+5:302022-09-15T23:45:25+5:30

Samruddhi Mahamarg Expressway: समृद्धी महामार्गावरील टोल दरांची माहिती देणाऱ्या फलकाचा फोटो सध्या व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे.

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. (samruddhi mahamarg expressway)

आधी या महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर त्याच्या नामकरणामुळे हा महामार्ग कायम चर्चेत राहिला. मात्र, त्याच्या उद्धाटनानंतर मुंबई ते नागपूर हे ७०१ किलोमीटरचे अंतर वेगाने पार करता येणार आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या द्रुतगती मार्गाचं नामकरण करण्यात आले आहे. (samruddhi mahamarg expressway toll price)

मात्र, यानंतर या महामार्गावर वाहनांना नेमका किती टोल भरावा लागणार? यासंदर्भात वेगवेगळी माहिती आणि अंदाज समोर येत होते. मात्र, आता पहिल्यांदाच महामार्गावर भराव्या लागणाऱ्या टोलची आकडेवारी समोर आली आहे. (samruddhi mahamarg expressway toll rates)

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनापूर्वी या महामार्गाच्या टोलची माहिती देणारा फलक महामार्गाच्या कडेला लावण्यात आला असून त्याचा फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील टोलचे दर किती कालावधीपर्यंत असणार आहेत. कोणत्या प्रकारच्या वाहनासाठी किती टोल आकारला जाणार आहे, याबाबती माहिती या फलकावर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. समृद्धी महामार्गावरील टोलचे हे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्थात पुढील जवळपास तीन वर्षांसाठी लागू असतील, असे या फलकावर नमूद करण्यात आले आहे.

या फलकावर नमूद केलेल्या दरांनुसार, साध्या चारचाकी वाहनांसाठी, अर्थात कार्ससाठीचा टोल या फलकावर नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार, या महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोलची वसुली करण्यात येणार आहे.

त्यामुळे मुंबई पासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे. वाहन प्रकार आणि त्यासाठी लागणार टोल याचीही माहिती या फलकावर देण्यात आली आहे.

मोटर, जीप, व्हॅन अथवा हलकी मोटर वाहने – १.७३ रुपये प्रतीकिमी, हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस – २.७९ रुपये प्रतिकिमी, बस अथवा ट्रक – ५.८५ रुपये प्रतिकिमी असा टोला आकारण्यात येणार आहे.

तसेच तीन आसांची व्यावसायिक वाहने – ६.३८ रुपये प्रतिकिमी, अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने – ९.१८ रुपये प्रतिकिमी, अतिअवजड वाहने (सात किंवा जास्त आसांची) – ११.१७ रुपये प्रतिकिमी असे दर असणारा फलक लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ७०१ किमी लांबीच्या या द्रुतगती महामार्गावर आता पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतुकीवर नियंत्रण या उद्देशाने या पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रकल्पाची कार्यान्वयीन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा पुढाकार घेतला असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.

प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतुकीवरील नियंत्रण या दुहेरी उद्देशाने दर ५० किमी अंतरावर १५ महामार्ग सुरक्षा पोलीस ठाण्यांची (ट्रॅफिक एड पोस्ट्स) उभारणी केली जाणार आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जातो. ताशी १२० किमी या वेगाने या द्रुतगती मार्गावर वाहने धावणार आहेत.

पोलीस ठाण्यांव्यतिरिक्त समृद्धी महामार्गावर २१ क्विक रिस्पॉन्स व्हेइकल (क्यूआरव्ही) तैनात करण्यात येणार आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचवता यावी, यासाठी टोलनाक्यांवर ही वाहने तैनात करण्यात येणार आहेत. अपघातानंतर जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असते. यावर एमएसआरडीसीने मार्गावर २१ रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.