लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 23:45 IST2025-11-03T23:25:02+5:302025-11-03T23:45:56+5:30
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून मिळणार आहे.

राज्यातील चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

ऑक्टोबर महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लागलं होतं, त्यांना या निमित्तानं दिलासा मिळाला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जारी करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. याचवेळी पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण करुन घेण्याचं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करणं आवश्यक करण्यात आलं आहे. राज्य सरकारचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. त्यासाठी विविध मार्ग अवलंबल्यानंतर ई केवायसी सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.

















