“तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?: माऊली, आता आम्हाला तुझा चमत्कार दाखव”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 05:43 AM2020-07-01T05:43:43+5:302020-07-01T07:15:25+5:30

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा माहोल आहे. सुमारे दीड तास मंत्रोच्चारांच्या साक्षीनं आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेचा विधी पार पडला

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरात आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली.

पहाटे अडीचच्या सुमारास मुर्तीसंवर्धनासाठी डोक्यावरुन पाण्याने तर पायावर पंचामृताचा अभिषेक पार पडला. त्यानंतर देवाला नवे वस्त्र परिधान करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केले, म्हणाले, मंदिरात भाषण करायचं नसतं, आपण सगळेजण माऊलींचे भक्त म्हणून जमलो आहोत, ना कोणी मुख्यमंत्री ना अधिकारी माऊलींसमोर आपण सगळे सारखेच आहेत.

हा मान मला मिळेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता, मान मिळाला पण अशा परिस्थितीत पूजा करावी लागेल हेदेखील कधी विचार केला नव्हता.

मी इथं आलोय, केवळ महाराष्ट्राच्या वतीनं नाही तर संपूर्ण विश्वाच्यावतीनं आलो आहे. माऊलींच्या चरणी साकडं घालायला आलो आहे. साकडं घातलं आहे, मला विश्वास आहे, आजपर्यंत अनेकदा माऊलींचे चमत्कार ऐकत आलो आहेत. कित्येक वर्ष ही परंपरा अविरत सुरु आहे.

आता मला या चमत्काराची परंपरा बघायची आहे. आम्हाला चमत्कार दाखव, मानवाने हात टेकले आहेत, आपल्याकडे काहीच औषध नाही, किती दिवस तोंडाला पट्टी बांधून जगायचं? संपूर्ण आयुष्य अखडून गेले आहेत.

आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचं संकट नष्ट होवो, संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो हे साकडं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विठ्ठला चरणी घातलं.

यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, पोलीस अधिक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.

चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते, मात्र यंदाच्या वर्षी कोरोना या महामारी संकटामुळे वारीत वारकऱ्यांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे राज्यातील प्रत्येक वारकरी हा आपल्या घरबसल्या माध्यमाद्वारे वारीची अनुभूती घेत आहे.