शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shivsena: परभणीतील विजयानंतरच शिवसेनेला मिळाला 'धनुष्यबाण', जाणून घ्या इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 12:29 PM

1 / 10
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचे उमेदवार कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन असे चिन्ह घेऊनही लढले. मात्र, पुढे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे समीकरण दृढ झाले.
2 / 10
शिवसेनेत असलेल्या दोन्ही गटांना आज निवडणूक आयोगाने अंतरिम आदेशाद्वारे धनुष्यबाण वापरण्यास मनाई केली आहे. आयोगाच्या अंतिम सुनावणीत काय फैसला येतो, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल. मात्र, धनुष्यबाण चिन्हाचा इतिहास काय सांगतो ते पाहुयात.
3 / 10
१९६८ च्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेने एक मिरवणूक काढली, त्यात शिवसैनिक असलेले लहू आचरेकर हे प्रभू श्रीराम बनले, तर ऑर्थर डिसुझा हा कार्यकर्ता लक्ष्मण बनला होता. राम-लक्ष्मणाच्या हाती ताणलेले धनुष्य होते. शिवसेना भविष्यात धनुष्यबाण चिन्ह घेणार, असे संकेत त्यातून देण्यात आले होते अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी सांगितली.
4 / 10
लक्ष्याचा अचूक वेध घेतो तो धनुष्यबाण. शिवसेना पक्ष म्हणून राजकीय वाटचालीत आता असाच अचूक वेध घेणार असल्याचे निदर्शक म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्हाची निवड केली, असे म्हटले जाते.
5 / 10
तर, शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणारा परभणी जिल्हा आहे. त्यामुळे, परभणी जिल्ह्यातूनच शिवसेनेला घातपात व्हावा, अशी कृती आमच्याकडून, होणार नाही, हे आपणास अभिमानाने सांगतो, असे परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी शिंदे गटाच्या बंडानंतर म्हटले होते. त्यावेळी, त्यांनी धनुष्यबाण चिन्हाचा इतिहासही सांगितला.
6 / 10
1989 साली शिवसेनेनं राज्यात लोकसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळेस परभणीचे शिवसेनेचे उमेदवार होते, कै. अशोकराव देशमुख. त्यांना निवडणुकीचं चिन्ह मिळालं होतं धनुष्यबाण. तर संभाजीनगरला मोरेश्वार साळवे हे उमेदवार होते, त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते.
7 / 10
त्यावेळी, शिवसेना पक्षाला अधिकृत चिन्ह मिळालं नव्हतं. या परभणीतील विजयाच्या मतावर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे कायम झालं. 1990 साली विधानसभेच्या निवडणुका शिवसेनेनं धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या.
8 / 10
त्यावेळी, 1990 साली 42 आमदार शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले. त्यामुळे, शिवसेनेला धनुष्यबाण शिवसेनेनेच दिला आहे. म्हणून, परभणीकर शिवसेनेसोबतच राहणार असल्याचं खासदार बंडू जाधव यांनी इतिहासाचा दाखला देत स्पष्ट केलं.
9 / 10
दरम्यान, पक्षाला शिवसेना नाव वापरतां येईल, परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल. शिवसेनेनं त्याला simplicitor हा शब्द वापरला आहे. शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावे लागेल असे आयोगाने सुचविले आहे. तसेच, धनुष्यबाण गोठवण्याचा आयोगाचा निर्णय तात्पुरता आहे. चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू राहील हे आयोगानं म्हटलं आहे.
10 / 10
अंतिम निवाडा कधी ते पुढील काळात ठरेल, चुकीची माहिती पसरवू नये, असे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी ट्विट करुन आवाहन केले आहे. त्यामुळे, शिवसेना नाव वापरुन अंधेरीतील पोटनिवडणूक शिवसेनेला लढवता येणार आहे. केवळ शिवसेना या नावासोबत आणखी एखादं नाव जोडावे लागणार आहे.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMember of parliamentखासदारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे