लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. य़ाच दरम्यान, ईशान्य दिल्लीतील काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?, ते फक्त बोलत आहेत. त्यांनी देशासाठी काहीही केलेलं नाही. ईशान्य दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी गेल्या 10 वर्षांत काहीही केलेलं नाही.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत काही ना काही बोलत असतात. कधी मन की बात, कधी नोटाबंदीवर, कधी जीएसटीवर, कधी हिंदी-मुस्लिमवर, ते चांगल्या गोष्टींवरही बोलतात. त्यांनी एक वचन दिलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. आता तर त्यांच्या दुसरा कार्यकाळ देखील समाप्त होण्याच्या जवळ आला आहे. त्यामुळे हे वचन कधी पूर्ण करणार?"
"दोन कोटी नोकऱ्यांचं काय झालं?"
"पंतप्रधानांनी तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. गेल्या 10 वर्षांपासून ते हीच गोष्ट रिपीट करत आहेत. ईशान्य दिल्लीतील लोकांनी भाजपा खासदार मनोज तिवारी यांना गेल्या दहा वर्षात नेमकं काय केलं? असा प्रश्न विचारा" असं देखील कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.
ईशान्य दिल्लीत ट्रॅफिक, पाणी साचणं आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या गंभीर समस्या आहेत. महागाई आणि बेरोजगारीच्या संकटात या भागातील लोक मोठ्या अडचणीत जगत आहेत. आता पंतप्रधान आणि त्यांच्या खासदारांनी काम करण्याची नाही, तर आतापर्यंत काय काम केलं ते दाखवून देण्याची वेळ आली आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी काम केलं नसेल तर त्यांना पद सोडावं लागेल असं म्हटलं आहे. ईशान्य दिल्लीतील भाजपा खासदार मनोज तिवारी यांचा पराभव करण्यासाठी कन्हैया कुमार जोरदार प्रचार करत आहेत.